मोर्चातून वाढीव आरक्षणाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 09:25 PM2019-06-30T21:25:31+5:302019-06-30T21:26:16+5:30
आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य निर्णय घेण्यात यावा. तसेच ५० टक्केच्यावर आरक्षण नसावेच या मुख्य मागणीसाठी हिंदू, मुस्लिम, जैन, सिख, ईसाई आदी धर्माच्या बांधवांनी एकत्र येऊन रविवारी वर्धा शहरातून मोर्चा काढला. हे आंदोलन सेव्ह मेरीट सेव्ह नेशन समितीच्या नेतृत्त्वात करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर मोर्चाचा समारोप अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथे झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य निर्णय घेण्यात यावा. तसेच ५० टक्केच्यावर आरक्षण नसावेच या मुख्य मागणीसाठी हिंदू, मुस्लिम, जैन, सिख, ईसाई आदी धर्माच्या बांधवांनी एकत्र येऊन रविवारी वर्धा शहरातून मोर्चा काढला. हे आंदोलन सेव्ह मेरीट सेव्ह नेशन समितीच्या नेतृत्त्वात करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर मोर्चाचा समारोप अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथे झाला. याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर यांना आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. सदर मोर्चात तरुण-तरुणी, महिला-पुरूष तसेच बच्चेकंपनी आणि वयोवृद्धही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
समारोपप्रसंगी दोघांनी केले मनोगत व्यक्त
सदर मोर्चाचा समारोप अनेकांत स्वाध्याय मंदिराच्या आवारात झाला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन खा. तडस व आ. भोयर यांना सादर करण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. मोर्चाच्या समारोपीय कार्यक्रमादरम्यान नागपूरचे डॉ. अनिल लद्धड, डॉ. राजेंद्र चांडक यांनी मनोगत व्यक्त केले.
बालकही उतरले रस्त्यावर
सदर मोर्चाचे नेतृत्त्व १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांनी केले. ‘मेरीट का अब यह है कहना... मुश्किल हो गया इस देश मे रहना’ अशा आशयाचा मजकुल लिहून असलेला फलक हातात घेऊन ते या मोर्चात सहभागी झाले होते.
तरुण-तरुणींनी नोंदविला निषेध
आरक्षणाच्या मुद्यावरून नागरिकांमध्ये रोष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या व्यक्तीला खरोखर आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण देण्यात यावे. शिवाय आरक्षणाची मर्यादा ५० टक्केच्यावर जाता कामा नये, अशी मागणी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींनी केली.
शिवाय सरकारच्या दुर्लक्षित धोरणाचा यावेळी निषेध नोंदविला.
मोर्चात यांचा राहिला सिंहाचा वाटा
मोर्चाच्या आयोजनाकरिता महाराष्ट्र ब्राह्मण सभा, उत्तर भारतीय समुदाय, पंजाबी सेवा समिती, सिंधी पंचायत, गुजराती समाज, अग्रवाल समाज, जैन समाज, माहेश्वरी समाज, कोमठी समाज, बोहरा समाज, कच्छी समाज, मुस्लिम समाजाच्या संघटनेच्या प्रतिनिधींचे विशेष सहकार्य लाभले. इतकेच नव्हे, तर समाजबांधवांनी या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सदर मोर्चात विविध धर्माच्या महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन वाढीव आरक्षणाच्या विरोधात आवाज बुलंद केला.
स्वच्छ शहराचा उद्देश जोपासला
आंदोलनात सहभागी झालेल्यांना ठिकठिकाणी पिण्याचे पाणी वितरीत करण्यात आले. परंतु, पाणी पिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रिकामा कागदी ग्लास रस्त्यावर टाकू नये या उद्देशाने ठिकठिकाणी खरड्याच्या कचराकुंडी ठेवण्यात आल्या होत्या. याच कचरापेट्यांमध्ये आंदोलकर्त्यांनी पाणी प्यायल्यानंतर रिकामा झालेला ग्लास टाकून स्वच्छ शहराचा उद्देश जोपासला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
योग्य कार्यवाहीसाठी उद्धव ठाकरेंना घालणार साकडे -सराफ
शिवसेना पक्षप्रमुखांनी माझ्यासारख्या खुल्या प्रवर्गातील व्यक्तीला जिल्हाप्रमुख म्हणून नेमले. शिवसेना पक्षात कधीही जातीपातीचा भेदभाव झालेला नाही. ‘मेरिट बचाओ राष्ट्र बचाव‘ हे अभियान कोणत्याही जातीचे अहित करणारे नाही. सर्वांना समान आणि गुणवत्तेनुसार न्याय मिळावा हाच एकमेव उद्देश आहे. याबाबत आज निवेदन प्राप्त झाले. मी जिल्हाप्रमुख म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सदर प्रकरणी योग्य कार्यवाहीची मागणी करून सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांनी दिली.
व्यापाऱ्यांनीही रविवारी दुपारी १२ पर्यंत प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.