प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवतीवर अत्याचार; वर्ध्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 01:03 PM2022-04-15T13:03:05+5:302022-04-15T13:04:54+5:30
पीडितेशी मैत्री करून जवळीक निर्माण करून आरोपीने तिचे शोषण केले.
वर्धा : २३ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वर्धा शहरात उघडकीस आली. याप्रकरणी १३ रोजी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेची ओळख आरोपी मनीष गजानन खिरडकर याच्याशी फेसबुकच्या माध्यमातून झाली. दोघेही एकमेकांशी बोलू लागल्याने त्यांच्यात चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून आरोपी मनीषने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. लग्नाची गळ घातली असता, आरोपीने नकार दिल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहेत.
अंबिका चौकातील हॉटेलात नेत शोषण
आरोपी मनीष खिरडकर याने पीडितेशी मैत्री करून तिला शहरातील अंबिका चौकात असलेल्या एका हॉटेलातील खोलीत नेत तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलेली आहे.
अश्लील व्हिडीओ तयार करून केले व्हायरल
पीडितेशी मैत्री करून जवळीक निर्माण करून आरोपीने तिचे शोषण केले. हा सर्व प्रकार त्याने त्याच्या मोबाईलमध्ये चित्रीत केला आणि ते अश्लील व्हिडीओ पीडितेचे मित्र आणि तिच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल केले.