नागपुरी संत्री बांगलादेश आणि श्रीलंकेनंतर आता दुबईतही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 03:47 PM2018-01-11T15:47:33+5:302018-01-11T15:52:04+5:30

आकाराने जरी ओबड-धोबड असला तरी चवीने नागपुरी संत्र्याने बाजी मारली आहे. त्याच्या आंबट-गोड चवीने आतापर्यंत बांगलादेश आणि श्रीलंकेच्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या संत्र्याला फळांची मोठी बाजारपेठ असलेल्या दुबईतून मागणी आली आहे.

Oranges of Nagpur are asked now in Dubai after Bangladesh and Sri Lanka | नागपुरी संत्री बांगलादेश आणि श्रीलंकेनंतर आता दुबईतही

नागपुरी संत्री बांगलादेश आणि श्रीलंकेनंतर आता दुबईतही

googlenewsNext
ठळक मुद्देवर्ल्ड आॅरेंज फेस्टीवलचे फलितएका महिन्याला जाणार पाच कंटेनर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आकाराने जरी ओबड-धोबड असला तरी चवीने नागपुरी संत्र्याने बाजी मारली आहे. नागपुुरात आयोजित वर्ल्ड आॅरेंज फेस्टीवलमध्ये आलेल्या बाहेर देशातील व्यापाऱ्यांना या संत्र्याने चांगलीच भुरळ घातली. त्याच्या आंबट-गोड चवीने आतापर्यंत बांगलादेश आणि श्रीलंकेच्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या संत्र्याला फळांची मोठी बाजारपेठ असलेल्या दुबईतून मागणी आली आहे.
मोर्शी येथे असलेल्या श्रीधर ठाकरे यांच्या संत्रा प्रक्रिया केंद्रातून दुबई येथे काही संत्रे चवीकरिता पाठविण्यात आली होती. या संत्र्याला त्यांच्याकडून पसंती आली असून संत्र्यांची मागणी करण्यात आली आहे. येथून आलेल्या मागणीपोटी आठवड्यात एक असे महिन्याकाठी पाच कंटेनर पाठविण्यात येणार आहे. हे कंटेनर समुद्रामार्गे जाणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी येथे पंजाबी संत्री जात होती. त्यावर असलेल्या कोटींगमुळे ते दिसायला आकर्षक आणि टिकावू राहत असल्याने त्याची मागणी वाढली होती. या तुलनेत नागपुरी संत्र्यावर ही प्रक्रिया करण्याकरिता शासनाच्यावतीने पाहिजे तसे पाठबळ मिळत नसल्याने अडचणी कायम आहेत.
विदर्भातील संत्र्याला बाजारात तसा दर मिळत नव्हता. यामुळे या संत्र्याला विदेशी ग्राहक मिळणे अपेक्षित होते. याचा प्रवास २० वर्षांपूर्वीपासूनच सुरू झाला. मोर्शी येथील प्रक्रिया केंद्रातून प्रारंभी दिल्ली, केरळ, जम्मू आणि आता मुंबई येथे संत्री पाठविण्यात येत आहे. यातूनच श्रीलंका आणि बांगलादेशात संत्रा पाठविण्यात येत आहे. याकरिता दिल्ली येथील दोन कंपन्यांना गे्रड निहाय संत्र्याची निवड करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यातून आतापर्यंत ५८६ टन संत्रा पाठविण्यात आला आहे.

नागपुरी संत्रा हे खरे ‘टेबल फूड’
परदेशात जाणाऱ्या संत्र्यात पंजाबी संत्राची अधिक मागणी आहे. मात्र ते संत्रं सहज सोलून खाता येत नाही. ते ज्यूसकरिता फायद्याचे ठरतात. या तुलनेत नागपुरी संत्री सहज सोलता येत असल्याने खाता येते. म्हणूनच नागपुरी संत्र खरे ‘टेबल फूड’ असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.


नागपुरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टीवल’चे आयोजन करण्यात आले होते. विदर्भात प्रथमच संत्र्याबाबत मोठी प्रदर्शनी लागली होती. शिवाय या संत्र्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. येथे संत्र्याचे देशपातळीवर मोठ मोठे व्यापारी आले होते. ‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकारात या फेस्टीवलची सर्वत्र चर्चा झाली. येथूनच नागपुरी संत्र्यांची एक देशपातळीवर एक ओळख निर्माण झाल्याने या संत्र्याला मोठी बाजारपेठ मिळण्याची अपेक्षा आहे.
- श्रीधर ठाकरे, संत्रा उत्पादक संघटनेचे नेते, मोर्शी.

दिसण्यात आणि रंगात सारखेपणा नाही
नागपुरी संत्र चवीला एकदम ‘बेस्ट’ आहे. पण ते बघायला सारखे नाही. शिवाय ते एका रंगाचे नाही. या संत्र्याचा काही भाग हिरवा तर काही भाग नारंगी आणि पिवळा दिसतो. यामुळे काही व्यापारी या संत्र्याच्या दर्जावर आक्षेप घेत आहेत. दिसायला ओबड-धोबड असलेल्या या संत्र्याला एक सारखा आकार येण्याकरिता कृषी तज्ज्ञांनी काही शोध लावण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Oranges of Nagpur are asked now in Dubai after Bangladesh and Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती