‘त्या’ घाटमालकाच्या अटकेचे आदेश
By admin | Published: June 5, 2017 01:03 AM2017-06-05T01:03:38+5:302017-06-05T01:03:38+5:30
तहसीलदारांनी पकडलेला अवैध रेतीचा ट्रक गुन्हा दाखल करून सेलू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.
रेती भरलेला ट्रक सोडल्याचे प्रकरण : एसपींनी केल्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तहसीलदारांनी पकडलेला अवैध रेतीचा ट्रक गुन्हा दाखल करून सेलू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. मात्र पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांनी यात व्यवहार करून तो ट्रक सोडला. तर रेती घाटमालकाला अभय दिले. या प्रकरणाचा ‘लोकमत’ने पाठपुरावा करीत प्रकरण उजेडात आणले. याची दखल घेत खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रकरणाची माहिती घेत मोकाट फिरत असलेल्या त्या घाटमालकाला अटक करण्याच्या सूचना केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. मात्र त्याने अटकपूर्व जामिनाकरिता न्यायालयात अर्ज केल्याने अटक तुर्तास टळली.
घाटमालकाकडून चिरीमिरी घेणाऱ्या या ठाण्यातील सदर प्रकरणाच्या तपासी अधिकाऱ्यांकडून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन होते किंवा त्या आदेशावर झालेला व्यवहार जड होतो, याकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा अभ्यास करून पोलीस अधीक्षकांना झालेल्या व्यवहाराची कल्पना आल्याने त्यांनी केवळ रेती घाटाचा मालकच नाही तर त्याच्या दिवानजीलाही तात्काळ अटक करण्याचे आदेश दिल्याचे कळते.
या प्रकरणातील अप्पर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी सत्यता जाणून तपासी अधिकाऱ्यांकडून केवळ अर्थपूर्ण व्यवहारामुळे कशी लपवाछपवी होत आहे याची खात्री केल्याची माहिती आहे. याची माहिती त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्यानंतर त्यांनी तपासी अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून चांगलेच सुनावल्याची माहिती आहे.
अटकपूर्व जामिनाकरिता आरोपी न्यायालयात
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला मेनखत येथील घाटमालकाने अटक टाळण्याकरिता अटकपूर्व जामीन मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्याने न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून तपासी अधिकारी शुभांगी ताकीत यांना आरोपीस अटक करून हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांची चमू कारवाईकरिता गेली असता त्यांनी याप्रकरणी न्यायालयात जामीनासाठी केलेला अर्ज दाखविला. त्यावर सोमवारी (दि.५ जून) पोलिसांचे मत मागितले आहे. त्यानुसार पुढील कारवाई होईल.
- संजय बोथे, ठाणेदार, सेलू.