वर्ध्यातील सेंद्रिय तूर विषमुक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 05:00 AM2021-03-24T05:00:00+5:302021-03-24T05:00:11+5:30
आत्माच्या पुढाकारातून आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्ह्यातील ५३० शेतकऱ्यांची निवड करून त्यांना सेंद्रिय पद्धतीने तूर पिकाचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ५३० एकर शेतजमिनीवर तुरीची लागवड केली होती. आत्माच्या कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात या पिकाची योग्य काळजी घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली, तर सध्या सर्व शेतकऱ्यांनी तुरीची मळणीही केली आहे.
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात तब्बल अडीच लाखांहून अधिक शेतकरी असून, अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. असे असले तरी काही शेतकरी नावीन्यपूर्ण प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेत असल्याचे वास्तव आहे. असाच काहीसा प्रयोग निवडक तूर उत्पादकांना सोबत घेऊन आत्माच्या पुढाकारातून वर्धा जिल्ह्यात करण्यात आला असून, या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तुरीचे नमुने ठाणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, वर्ध्यातील सेंद्रिय तूर विषमुक्त असल्याचा अहवाल या प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी दिला आहे.
आत्माच्या पुढाकारातून आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्ह्यातील ५३० शेतकऱ्यांची निवड करून त्यांना सेंद्रिय पद्धतीने तूर पिकाचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ५३० एकर शेतजमिनीवर तुरीची लागवड केली होती. आत्माच्या कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात या पिकाची योग्य काळजी घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली, तर सध्या सर्व शेतकऱ्यांनी तुरीची मळणीही केली आहे. याच ५३० शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तुरीचे नमुने ठाणे येथील शासनमान्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच आत्माच्या प्रकल्प संचालक कार्यालयास प्राप्त झाला असून, या सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेली तूर विषमुक्तच असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या तुरीला रासायनिक पद्धतीचा अवलंब करून पिकविलेल्या तुरीच्या तुलनेत जास्त भाव मिळत आहे.
आत्मा इच्छुकांना मिळून देणार तूर डाळ
सेंद्रिय पद्धतीने तुरीचे उत्पादन घेणारे बहुतांश शेतकरी तुरीची डाळ करून त्याची विक्री करतात. दलालांची कुठलीही मध्यस्थी न होऊ देता शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळून देण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून विषमुक्त तूर डाळ खरेदी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला आत्मा तूर डाळ मिळवून देणार आहे. त्यामुळे इच्छुकांना आत्माच्या प्रकल्प संचालक कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात पाठविले तुरीचे नमुने
सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या ५३० शेतकऱ्यांच्या तुरीचे नमुने गोळा करून ते फेब्रुवारी महिन्यात ठाणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले हाेते. त्याचे अहवाल मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात प्राप्त झाले आहेत.
अहवालात तज्ज्ञांनी हे केले आहे नमूद
रासायनिक उर्वरित अंश तपासणी अहवालात रासायनिक कीटकनाशक, तसेच तणनाशकांचे अंश शासन मान्यतेप्रमाणे परमिसिबल लेवलपेक्षा कमी आढळल्याचा अहवाल ठाण्याच्या प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी दिला आहे.
सेंद्रिय पद्धतीने ५३० शेतकऱ्यांनी पिकविलेल्या तुरीचे नमुने तपासणीसाठी ठाणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. या रासायनिक उर्वरित अंश तपासणी अहवालात रासायनिक कीटकनाशक व तणनाशकांचे अंश शासन मान्यतेप्रमाणे परमिसिबल लेवलपेक्षा कमी असल्याचे नमूद आहे. म्हणजेच सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली तूर ही विषमुक्त आहे.
- डॉ. विद्या मानकर, प्रकल्प संचालक, आत्मा, वर्धा.