वर्धा जिल्ह्यातील पाचोडमधील सेंद्रिय फळ, भाजीपाल्याला मुंबईकरांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 02:33 PM2020-10-28T14:33:05+5:302020-10-28T14:33:25+5:30
Agriculture Wardha News वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या पाचोड येथील शेतकऱ्यांचा सेंद्रिय फळ व भाजीपाला थेट मुंबईत पोहोचला असून चांगला भावही मिळाला आहे.
सचिन देवतळे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. पण, आता मॉल संस्कृतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने त्याचा फायदा होत आहे. नुकताच वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या पाचोड येथील शेतकऱ्यांचा सेंद्रिय फळ व भाजीपाला थेट मुंबईत पोहोचला असून चांगला भावही मिळाला आहे.
आर्वी तालुक्याच्या विरुळ (आकाजी) नजीकच्या पाचोड येथील शेतकऱ्यांनी आकाजी महाराज शेतकरी प्रोड्युसर कंपनीअंतर्गत इको फार्म, यवतमाळ या संस्थेच्या तसेच आर्वी व कारंजा तालुक्यातील कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशनअंतर्गत वाडी कार्यक्रम व नैसर्गिक शेती कार्यक्रम राबवून सेंद्रिय शेती केली. या शेतातून निघालेला आवळा, लिंबू, पपई व संत्री आदी फळे व भाजीपाला गावातून थेट मुंबईच्या मॉलमध्ये पाठविण्यात आला आहे. फळ व भाजीपाला भरलेला ट्रक मुंबईकडे रवाना करताना पाचोडचे सरपंच गजानन दोरजे, टेंभरी (परसोडी) येथील सरपंच सुरेखा पांढरे व गावातील शेतकरी उपस्थित होते.
दारातून केली शेतमालाची उचल
पाचोड येथील ५०० किलो आवळा, ५०० किलो लिंबू, ६५० किलो पपई व ६५० किलो संत्री आदी सेंद्रिय
शेतमालाची थेट दारातूनच उचल करण्यात आली. या शेतमालाचे क्लिनिंग व ग्रेडिंग करून मुंबईला पाठविण्यात आले. हे फळ व भाजीपाला इको फार्म संस्थेमार्फत शॉपिंग मॉलला पुरविला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खचार्ची बचत होऊन चांगला भाव मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.