मुसळधार पावसाचे वर्ध्यात तांडव; दहा गायींसह तीन इसम गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 09:53 PM2022-07-09T21:53:02+5:302022-07-09T21:53:25+5:30
Wardha News वर्धा जिल्ह्यातील विविध भागात शनिवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतशिवार जलमय झाले असून नदी तसेच नाले ओसंडून वाहत आहेत.
वर्धा : जिल्ह्यातील विविध भागात शनिवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतशिवार जलमय झाले असून नदी तसेच नाले ओसंडून वाहत आहेत. नदी व नाल्याच्या पुरात दहा गायीसह तीन मनुष्य वाहून गेलेत. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते.
देवळी तालुक्यातील सोनेगाव (आबाजी), सोनोरा (ढोक) तर वर्धा तालुक्यातील वायफड, सालोड, धोत्रा या गावात नदी व नाल्याच्या पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. तर वर्धा नजीकच्या धोत्रा शिवारात नाल्याच्या पुरामुळे १५ मजूर अडकले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू होते. वर्धा शहरातील सुमारे ३२८ घरांत पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
अल्लीपूर नजीकच्या नांदगाव (कानगाव) येथे वीज पडून गीता गजानन मेश्राम यांचा मृत्यू झाला. सेवाग्राम येथे सुमारे २२ नागरिकांच्या घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांत पावसाचे पाणी शिरले. हिंगणघाट तालुक्यातील सिरसगाव येथे नाल्याच्या पुरात बैलजोडीसह बैलगाडी वाहून गेली. यात एका बैलाचा मृत्यू झाला. विरुळ येथे लेंडी नाल्याच्या पुरात दहा गायी वाहून गेल्यात.
पुलगाव येथे एक महिला तर कुरझडी येथे एक पुरुष वाहून गेला. तर देवळी तालुक्यातील पिपरी (आगरगाव) येथे एक पुरुष वाहून गेला. एकूणच शनिवारी झालेल्या पावसाने वर्धा जिल्ह्यात तांडवच केला.