विश्वाच्या पसाऱ्याची सुरूवातच वनस्पतीच्या अस्तित्वापासून
By admin | Published: February 2, 2017 12:52 AM2017-02-02T00:52:13+5:302017-02-02T00:52:13+5:30
मनुष्याचं जीवन निसर्ग आणि झाडाझुडूपांनी वेढलेले आहे. विश्वाच्या पसाऱ्याची सुरूवातच वनस्पतीच्या अस्तित्वापासून झाली.
राजेंद्रसिंह : हुतात्मा स्मारक परिसरात कार्यक्रम
वर्धा : मनुष्याचं जीवन निसर्ग आणि झाडाझुडूपांनी वेढलेले आहे. विश्वाच्या पसाऱ्याची सुरूवातच वनस्पतीच्या अस्तित्वापासून झाली. मानवी जीवनाच्या आधीपासून हे हिरवेपण आपली सोबत करीत आहे. वृक्षतोड झाल्याने धरणी ओसाड होत गेली. तिच पूर्वस्वरूप प्राप्त करायचं असेल तर वृक्ष लागवड ही जन चळवळ व्हावी, असे प्रतिपादन प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी केले.
स्मृतिवृक्ष लागवडीसारख्या संकल्पनेतून ही धरती हिरवी करण्यास मदत होईल. आपल्या संस्कृतीतील वृक्षपूजन हे निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. माणसं उलट वागत गेल्याने निसर्गाची अपरिमीत हानी झाली आहे, असे पुढे बोलताना राजेंद्रसिंह म्हणाले.
निसर्ग सेवा समिती वर्धाद्वारे हुतात्मा स्मारक परिसर, सेवाग्राम येथे कार्यक्रम घेण्यात आला. महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त राजेंद्रसिंह सेवाग्राम येथे आले असताना त्यांचे व्याख्यान घेण्यात आले. यावेळी परिसरात वृक्षोरापण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, गांधी विचार परिषदेचे निदेशक भरत महोदय, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, डॉ. सोहम पंड्या, बापूराव देशमुख अभियांत्रिकी सेवाग्रामचे प्राचार्य डॉ. महेंद्र गायकवाड, प्रकाश येंडे, डॉ. हेमचंद्र वैद्य यांची उपस्थिती होती.
निसर्ग सेवा समितीचे संस्थापक, कोषाध्यक्ष, अजाबराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्मृतीवृक्षरोप मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात आले. वर्धा शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण चळवळ पुढे नेण्यात अजाबराव यांचे योगदान मोठे आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी दिली. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी यावेळी समायोचित विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रभाकर गायकवाड, प्रा. जयंत गंडोले, रत्नाकर मिसाळ, विष्णूजी मसने, रमेश परिमल, अडसड, नितीन, पद्मा गायकवाड, सरीता आवते, रविंद्र शिंदे, विनय आवते, रामराव नाकाडे, रामराव माहुरे व परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सचिव सुभाष ढोबळे यांनी मानले. बा.दे. हांडे यांनी अमर जीवन संदेश वाचून राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)