आरोग्य उपकेंद्र ठरतेय शोभेची वास्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:12 AM2017-12-22T01:12:06+5:302017-12-22T01:12:29+5:30
जिल्ह्यात मोठे तथा २० गावांची बाजारपेठ म्हणून वायगावची ओळख आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्व राखणाºया या गावात २० हजारांवरील लोकसंख्येसाठी केवळ आरोग्य उपकेंद्र देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : जिल्ह्यात मोठे तथा २० गावांची बाजारपेठ म्हणून वायगावची ओळख आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्व राखणाऱ्या या गावात २० हजारांवरील लोकसंख्येसाठी केवळ आरोग्य उपकेंद्र देण्यात आले आहे. ते देखील अनेकदा बंदच राहत असल्याने सदर उपकेंद्र शोभेची वास्तू ठरत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
गावातील आरोग्य प्रशासन सुस्त आहे. परिणामी, नागरिकांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो. या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू असल्याने मंडी बंद करण्यात आली. त्याऐवजी प्राथमिक उपकेंद्र आहे. येथे प्राथमिक उपचार, प्रसूति तथा नागरिकांवर औषधोपचार होणे अपेक्षित होते; पण ते बंदच राहत असल्याने शोभेची वास्तू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या आरोग्य उपकेंद्रात दोन आरोग्य सेविका व एक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याची नेमणूक आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी गावातील सर्वेक्षणाचे काम करतात. आरोग्य सेविकांना वरिष्ठांच्या आदेशावरून तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देण्यासाठी जावे लागत आहे. यामुळे येथील आरोग्य उपकेंद्र बहुतांश वेळा बंदच असते. पालकमंत्र्यांनी प्रत्येक सोमवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यरत ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले होते; पण ते देखील पाळले जात नाही. यामुळे आरोग्य सेवेचा खेळखंडोबा झाला असून वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.