त्यागमय जीवन जगणाऱ्या बापूंप्रति आमची श्रद्धाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 07:20 PM2021-10-02T19:20:13+5:302021-10-02T19:20:46+5:30
Wardha News बापूंप्रति आमची श्रद्धाच आहे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
सेवाग्राम (वर्धा) : राष्ट्रपिता महात्मा गांधी सत्य, शांती व अहिंसेचे प्रेरक राहिले आहे. त्यांनी देशासाठी त्यागमय जीवन जगून हजारो व्यक्तींना प्रेरित केले असून, आजही जगाला प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे बापूंप्रति आमची श्रद्धाच आहे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. (Bhagat singh Koshyari)
महात्मा गांधी यांच्या १५२व्या जयंतीनिमत्ताने आदरांजली वाहण्यासाठी राज्यपाल शनिवारी ते सेवाग्राम आश्रमात आले होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता विजय गाखरे यांच्यासह आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू व मंत्री मुकुंद मस्के यांनी सूतमाळेने स्वागत केले. त्यानंतर बापू कुटीत सर्वांनी प्रार्थना करून आदरांजली वाहिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, आश्रमातील स्मारके जास्तीत जास्त काळ टिकली पाहिजे, असे नियोजन करावे. साबरमती आश्रमाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पना मांडली; पण त्याला विरोध झाला, असेही राज्यपाल यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश काळपे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलिंद भेंडे, अविनाश देव, वरूडच्या सरपंच सुनीता ढवळे, सेवाग्रामचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.
राज्यपालांना आठवले आजोबांचे गाव
सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीमध्ये प्रार्थना केल्यानंतर त्यांनी परिसरातील सर्व कुट्यांची पाहणी केली. यावेळी उपस्थितांसोबत चर्चा करताना येथील कुट्या पाहून त्यांना त्यांच्या आजोबाच्या घराची आठवण झाली. ‘माझ्या आजोबाचे घर असेच मातीचे होते. त्या घरात आम्ही राहिलो; पण आज त्याला टिकविणे कठीण आहे. आश्रमातील सर्वच कुट्या दीर्घकाळ कशा टिकतील याचा विचार होणे आवश्यक आहे,’ असे राज्यपाल म्हणाले. या कुट्यांच्या देखभालीसंदर्भात आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभू यांना विचारणा केली. तेव्हा आश्रमातील कुट्यांना उत्तम ठेवण्याकरिता प्रतिष्ठान सतत प्रयत्नशील असते. या कुट्यांमधून बापूंच्या विचारांचा सतत दरवळ असतो, असे प्रभू म्हणाले.