सभापतींच्या निवडीवर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 10:35 PM2019-11-30T22:35:53+5:302019-11-30T22:39:58+5:30
जिल्हाधिकारी वर्धा यांच्या २२ नोव्हेंबरच्या निर्देशानुसार विशेष सभेचे आयोजन येथील नगर पंचायत मध्ये करण्यात आले होते. नगर पंचायतमधील स्थायी समिती, बांधकाम समिती, पाणी पुरवठा समिती, महिला व बालकल्याण समिती, आरोग्य व नियोजन आणि क्रीडा व सांस्कृतिक समिती या समित्यांचे सभापतींची निवड करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याबरोबरच समुद्रपूर येथील नगर पंचायत मध्ये सत्तारूढ असलेल्या पदाधिकाऱ्यांमधील सत्ता संघर्ष टिपेला पोहचला. शनिवारी विविध विषय समितीच्या सभापती पदांची निवडणूक होत असताना सत्ताधारी पक्षातील तीन नगरसेवक व विरोधी पक्षातील चार नगरसेवक अशा एकूण सात नगरसेवकांनी या निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. या व्यतिरिक्त दोन स्वीकृत सदस्यांनी बैठकीला गैरहजेरी नोंदविली.
जिल्हाधिकारी वर्धा यांच्या २२ नोव्हेंबरच्या निर्देशानुसार विशेष सभेचे आयोजन येथील नगर पंचायत मध्ये करण्यात आले होते. नगर पंचायतमधील स्थायी समिती, बांधकाम समिती, पाणी पुरवठा समिती, महिला व बालकल्याण समिती, आरोग्य व नियोजन आणि क्रीडा व सांस्कृतिक समिती या समित्यांचे सभापतींची निवड करण्यात आली. सभागृहात एकूण १७ नगरसेवकांपैकी केवळ दहा नगरसेवक उपस्थित होते. या निवडणुकीत सर्व नगरसेवकांना विश्वासात न घेता सत्ता पक्षातील काहींनी मनमर्जीने आपापल्या गळ्यात विजयी माळा टाकल्या. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रिया केवळ देखावा असल्याचा आरोप करीत विरोधी सदस्यांसह काही सत्तापक्षातील सदस्यांनी सदर निवडीवर बहिष्कार टाकला.
विषय समिती निवडणूक प्रक्रिया निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बहिष्कार टाकणाऱ्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी गटनेता मधुकर कामडी, आशिष अंड्रस्कर, सरिता लोहकरे, हर्षा डगवार, भाजपा समर्थित शेतकरी संघटनेचे अंकुश आत्राम, सुनिता सुरपाम, रवींद्र झाडे यांचा समोवश होता.
सदर निवडणुकीत आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही. कार्यहीन आणि अर्थहीन समितीत राहणे, अयोग्य वाटते. सबब शेतकरी संघटनेच्या दोन नगरसेवकांसह मी स्विकृत नगरसेवक बहिष्कारात सहभागी झालो.
दिनेश निखाडे, स्विकृत नगरसेवक , समुद्रपूर
नगराध्यक्षासहीत सत्ताधारी सदस्य विरोधी पक्षातील सदस्यांना विश्वासात घेत नाही. विषय समिती सभापती केवळ नावाचे फलक लावणे व शोभेचा दर्जा प्राप्त करून घेण्याचा प्रकार आहे. विषय निहाय जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी विषय समिती सभापतींची कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही तसेच निर्णय केल्याचे निदर्शनास येत नाही. जनतेच्या प्रश्नांना बगल देऊन केवळ नावाचे फलक न.प.च्या इमारतीत दर्शनिय भागावर लावणे, एवढाच उद्देश अनुभवत असल्यामुळे आम्ही सदर निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
मधुकर कामडी, विरोधी पक्षनेता, नगर पंचायत समुद्रपूर
सभागृहामध्ये केवळ दहा नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे पिठासीन अधिकाऱ्यांनी दहा सदस्यांमधून निवड प्रक्रिया राबविली.
गजानन राऊत, नगराध्यक्ष, न.प. समुद्रपूर