1,387 पैकी 1,338 गावांची पैसेवारी 51 पैशांहून अधिकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2021 05:00 AM2021-11-06T05:00:00+5:302021-11-06T05:00:02+5:30
वर्धा तालुक्यातील केवळ एका गावाची पैसेवारी ५१ ते ६० मध्ये असून १५३ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. सेलू तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये असून देवळी तालुक्यातील ३६ गावांची ५१ ते ६० व ९३ गावांशी ६१ ते ७० तर २० गावांची पैसेवारी ७१ ते ९० पैशामध्ये आहे. हिंगणघाट तालुक्यातील १८७ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. समुद्रपूर तालुक्यातील २२ गावांची ६१ ते ७० व १२१ गावांची ७१ ते ८० तर ७६ गावांशी पैसेवारी ८१ ते ९० पैशामध्ये आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील १ हजार ३८७ गावे खरीप पिकाखाली असून यंदाच्या वर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उसंत घेत सुरू राहिलेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान केल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पदरी नापिकी आली. इतकेच नव्हे तर प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणांमुळे आणि लागवड योग्य नसल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ४९ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड झाली नाही. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर केली असून यात तब्बल १ हजार ३३८ गावांची खरीप पिकांची पैसेवारी ५१ पैशांहून अधिक असल्याचे नमूद केले आहे.
वर्धा तालुक्यातील केवळ एका गावाची पैसेवारी ५१ ते ६० मध्ये असून १५३ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. सेलू तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये असून देवळी तालुक्यातील ३६ गावांची ५१ ते ६० व ९३ गावांशी ६१ ते ७० तर २० गावांची पैसेवारी ७१ ते ९० पैशामध्ये आहे. हिंगणघाट तालुक्यातील १८७ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. समुद्रपूर तालुक्यातील २२ गावांची ६१ ते ७० व १२१ गावांची ७१ ते ८० तर ७६ गावांशी पैसेवारी ८१ ते ९० पैशामध्ये आहे. आर्वी तालुक्यातील ३४ गावांची पैसेवारी ५१ ते ६० तर १७३ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. आष्टी तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशांत असून कारंजा तालुक्यातील १०० गावांची पैसेवारी ५१ ते ६० तर २० गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये असल्याचे सांगण्यात आले.
६१ ते ७० पैशात तब्बल ९५० गावांची पैसेवारी
- जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील १ हजार ३३८ गावांची सुधारित पैसेवारी जाहीर केली असून ५१ ते ६० मध्ये १७१, ६१ ते ७० मध्ये ९५०, ७१ ते ८० मध्ये १४१ तर ८१ ते ९० मध्ये ७६ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यातीची पैसेवारी ५० पैशाच्या आत असते त्या जिल्ह्यांना शासनाकडून विविध योजनांचा विशेष लाभ दिला जातो.
हवालदिल शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
- यंदाच्या वर्षी अनेक सोयाबीन उत्पादकांना समाधानकारक उत्पन्न झाले असले तरी जिल्ह्यातील काही सोयाबीन उत्पादकांच्या पदरी नापिकीच आली आहे. तर यंदा दोन वेचणीनंतर कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रब्बी पिकांसाठी तयार होतेय शेत जमीन
सेलू तालुक्यातील अनेक शेतकरी कपाशी उपटून रब्बी चणा किंवा गहू पिकाची लागवड करण्याच्या तयारीत आहे. तर काही हवालदिल शेतकरी खरीप हंगामातील नुकसान भरून काढता यावे या हेतूने रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतजमीन तयार करीत आहेत.
विशेष अनुदानापासून राहावे लागेल वंचित
- ज्या जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशाच्या आत असते त्या जिल्ह्याला तसेच त्या तालुक्याला शासनाकडून विशेष अनुदान जाहीर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिल्या जातो. पण यंदा वर्धा जिल्ह्यातील १ हजार ३३८ गावांची पैसेवारी ५० पैशाहून अधिक असल्याने शासनाच्या विशेष अनुदानापासून वर्धा जिल्ह्याला वंचितच राहावे लागणार आहे.