कृषी पंपाच्या देयकांची थकबाकी ८३.८५ कोटींवर
By admin | Published: June 9, 2017 01:58 AM2017-06-09T01:58:53+5:302017-06-09T01:58:53+5:30
संतप्त शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे अख्खे राज्य ढवळून निघाले आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावत असून
६३ हजार ५४ शेतकरी : नवे ३,२४९ शेतकरी प्रतीक्षा यादीत
रूपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संतप्त शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे अख्खे राज्य ढवळून निघाले आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावत असून त्यांना आधार देण्याकरिता कर्जमाफीसह कृषी पंपाच्या देयकाची थकबाकी माफ करण्याची मागणी झाली. वर्धेतील तब्बल ६३ हजार ५४ शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे कृषी पंपाच्या देयकाचा भरणा केला नसल्याने त्याची थकबाकी ८३.८५ कोटींवर पोहोचली आहे. ही रक्कम माफ झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील एक मोठे कर्ज कमी होणार आहे.
विदर्भातील कोरडवाहू भाग सिंचनाखाली आणण्याकरिता शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी पंप देण्यात आले. या योजनेत कृषी पंप घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून त्यांच्या वापराअंती वीजभार अदा करणे अनिवार्य आहे. या कृषी पंप देयकाच्या थकबाकीचा भरणा करण्याकरिता महावितरणच्यावतीने विविध योजना राबविल्या जात आहेत; पण या योजनाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अडचणीची ठरत आहे.
सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना येत असलेले देयक भरणे कठीण जात असल्याने त्यांच्याकरिता सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला; पण या योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक असलेला शेतकऱ्यांचा वाटा भरणे कठीण जात असल्याने या योजनेकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष नसल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी वर्धेत १०९ शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपाच्या माध्यमातून सिंचन सुरू केले आहे.
थकबाकी शंभर कोटी रुपयांवर जात असताना वर्धेत कृषी पंपाची मागणी वाढतच असल्याचे दिसून आले आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ३ हजार २४९ शेतकरी कृषी पंपाच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत ४ हजार ८६९ शेतकऱ्यांना जोडण्या मिळाल्या आहेत. या शेतकऱ्यांना अनुदानावर जोडण्या देण्यात येत असल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात १०९ शेतकऱ्यांकडून सौर सिंचन
शेतकऱ्यांवर वीज देयकाचा भुर्दंड बसू नये याकरिता शासनाच्यावतीने अनुदानावर सौर कृषी पंप देण्याची योजना आखण्यात आली; पण यात अश्वशक्तीनुसार भरावी लागणारी रक्कम शेतकऱ्यांना परवडणारी नाही, असे म्हणत शेतकरी या योजनेला पाठ दाखवित आहे. जिल्ह्यात आलेल्या मागणीनुसार २६८ सौर कृषी पंप मंजूर आहेत. त्यापैकी १८६ शेतकऱ्यांनी आवश्यक रक्कम महावितरणकडे भरली आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांकडून ते भरणे अद्याप बाकी आहे. ज्यांनी अनुदान भरले त्यापैकी १०९ शेतकऱ्यांच्या शेतात पंप उभारले आहे. त्यांच्याकडून या माध्यमातून ओलीत करणे सुरू आहे. असे असले तरी प्रारंभी देण्यात आलेल्या उद्दिष्टापासून जिल्हा अद्यापही दूरच असल्याचे दिसून येत आहे.
कृषी पंपाच्या वीज देयकाची थकबाकी भरण्याकरिता शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. त्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यास हा आकडा नक्कीच कमी होईल. थकबाकी असलेल्या जोडण्यासंदर्भातील कुठल्याही नव्या निर्णयाची माहिती नाही.
- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा.