वर्धा बाजारपेठेत ४.९७ कोटींच्या सोयाबीनची उलाढाल; ४,५०० ते ५,६०० रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 05:42 PM2021-10-26T17:42:04+5:302021-10-26T17:46:43+5:30
वर्धा कृषी उत्पन्न बाजारपेठेत एकूण ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला आहे.
वर्धा : दिवाळीच्या तोंडावर वर्धा बाजारपेठेत तब्बल ४ कोटी ९७ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सोयाबीनची उलाढाल झाली आहे. सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून सरासरी साडे ४ हजार ते ५ हजार ६०० रुपये भाव देण्यात आला आहे.
दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख. वर्धा कृषी उत्पन्न बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढली आहे. आतापर्यंत या बाजारपेठेत एकूण ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षी सुरुवातीस उसंत घेत सुरू राहिलेल्या पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला फटका बसला. तर पीक कापणीला आले असतानाही पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादकांच्या पदरी नापिकी येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती; परंतु ऑक्टोबर महिन्यात पावसाने विश्रांती घेताच जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनाही दिलासा मिळाला. पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीन कापणी व मळणीच्या कामांना गती देत सोयाबीन पीक घरी आणले. दिवाळी हा सण येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून आपलीही दिवाळी चांगली व्हावी या हेतूने काही शेतकरी सोयाबीनची विक्री करीत आहेत. वर्धा बाजारपेठत आतापर्यंत ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.
वर्धा बाजारपेठेत ५४ परवानाधारक व्यापारी
जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल ५४ परवानाधारक व्यापारी आहेत. याच परवानाधारक व्यापाऱ्यांकडून वर्धा बाजार समितीच्या यार्डवर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले जात आहे. शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना चांगली सेवा-सुविधा देण्यासाठी बाजार समिती प्रयत्न करीत आहे.
प्रतिक्रिया
दिवाळीचे औचित्य साधून मोठ्या संख्येने शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या यार्डवर विक्रीसाठी आणत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे वेळीच चुकारे द्यावे, अशा सूचना आपण व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येत असल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा.
- श्याम कार्लेकर, सभापती, कृ.उ.बा. समिती, वर्धा.
यंदाच्या नवीन हंगामात आतापर्यंत वर्धा बाजार समितीत ११ हजार ५० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये भाव देण्यात आला आहे.
- समीर पेंडके, सचिव, कृ.उ.बा. समिती, वर्धा.