उन्नत शेतीतून ६,३९० शेतकरी समृद्धीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:22 AM2017-07-21T02:22:36+5:302017-07-21T02:22:36+5:30
शेतकऱ्यांना शेतीचा अनुभव आहे; पण त्यांच्याकडून होत असलेली शेती ही पारंपरिक पद्धतीचीे आहे.
१,५६० हेक्टरवर विकसित तंत्रज्ञानाने शेती : बियाण्यांच्या क्षमतेनुसार उत्पादनाचे उद्दिष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांना शेतीचा अनुभव आहे; पण त्यांच्याकडून होत असलेली शेती ही पारंपरिक पद्धतीचीे आहे. यामुळे त्यांना अपेक्षित उत्पन्न होण्याची हमी कमी आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्याकरिता शासनाने राबविलेल्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानातून वर्धा जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ३९० शेतकऱ्यांनी समृद्धीची वाट धरल्याचे दिसून आले आहे.
शेती शेतकऱ्यांची, तंत्रासह बियाणे आमचे; पण उत्पन्न तुमचे असे म्हणत शासनाने राज्यात हे अभियान सुरू केले आहे. या अभियानातून शेतकऱ्यांना लागवड व पेरणीच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात येत आहे. या अभियानात सहभागी शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञ प्रशिक्षण देत असून त्यांच्या मार्गदर्शनातून वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १ हजार ५६० हेक्टरवर विकसित तंत्राने शेती सुरू आहे.
या अभियानात शेतकऱ्यांकडून वापरण्यात येत असलेल्या बियाण्यांच्या क्षमतेनुसार उत्पादनाचें उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अभियानात प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांकडूनच दुसऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचाही प्रयोग होत आहे. यातून शेतकऱ्यांचा विश्वास वाढणार असल्याचेही कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
अभियानात सहभागी शेतकऱ्यांना शासनाच्या कंपनीचे बियाणे देण्यात आले आहे. या बियाण्यावर काही शेतकऱ्यांनी अविश्वास दर्शविल्याने त्यांना त्यांच्या पसंतीचे बियाणे वापरण्याचीही मुभा देण्यात आली आहे. याची रक्कम शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून परत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.