रसुलाबादच्या ‘गंदगीमुक्त गाव’ची सातासमुद्रापार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 09:27 PM2020-10-13T21:27:15+5:302020-10-13T21:30:17+5:30
Wardha News राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील या गावाची शॉर्ट फिल्म जगाला सध्या स्वच्छतेचा संदेश देत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी तालुक्यातील सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या रसुलाबाद या गावाची चर्चा आता युट्युबच्या माध्यमातून संपूर्ण जगात होत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील या गावाची शॉर्ट फिल्म जगाला सध्या स्वच्छतेचा संदेश देत आहे. विशेष म्हणजे, रसुलाबाद या गावातील लघु चित्रपटाला आतापर्यंत पाच हजारांहून अधिक व्व्हयुज मिळाले आहेत.
सरपंच म्हणून रसुलाबादची धुरा सांभाळणारे राजेश सावरकर यांनी ही एक नवीन संकल्पना अमलात आणली. त्यांनी याची माहिती त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत सचिव, जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्या नंतर सर्व संमतीने रसुलाबाद या गावात गंदगीमुक्त गाव या लघु चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. याच चित्रिकरणादरम्यान गावातील प्रत्येक व्यक्तीने स्वच्छ आणि सुंदर गावाचा संकल्प सोडला. त्यानंतर या गावाचा आता चेहराच बदलला आहे. सध्या या गावाची चर्चा युट्युब या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगात होत आहे. आतापर्यंत सदर लघुपटाला पाच हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ३१८ व्यक्तीनी त्याला लाईक्स दिले आहेत. तर केवळ सात व्यक्तींनी लघुपट आवडला नसल्याचा अभिप्राय नोंदविला आहे.
रसुलाबाद ग्रामपंचायतने बनविलेल्या शॉर्ट फिल्मला आतापर्यंत ५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही संकल्पना पूर्णत्त्वास जाण्यासाठी जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी, पं.स.चे गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतीतील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे सरपंच म्हणून हे माझे एकट्याचे यश नव्हे तर सामुहिक प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे.
- राजेश सावरकर, सरपंच, रसुलाबाद.