टेकडीवरील ऑक्सिजन पार्कला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:22 PM2019-05-13T22:22:00+5:302019-05-13T22:22:49+5:30
स्थानिक हनुमान टेकडी भागातील ऑक्सिजन पार्क परिसरात अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमारे १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे, तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रिप पाईप व इतर साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग लागली की कुणी लावली, याचा मात्र उलगडा झालेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक हनुमान टेकडी भागातील ऑक्सिजन पार्क परिसरात अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमारे १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे, तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रिप पाईप व इतर साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग लागली की कुणी लावली, याचा मात्र उलगडा झालेला नाही.
पूर्वी ओसाड असलेल्या हनुमान टेकडी परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि वर्धा शहरातील काही सुजाण नागरिकांनी एकत्र येत श्रमदान करून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली. त्याच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी इतक्यावरच थांबून न जाता त्या रोपट्यांचे संगोपनही केले. परिणामी, हनुमान टेकडी परिसराला ‘ऑक्सिजन पार्क’ अशीच नवी ओळख मिळाली. याच ऑक्सिजन पार्क परिसरात अनेक जण सकाळी फिरायला येत असून रविवारी रात्री उशीरा अचानक याच परिसरात आग लागली.
ऑक्सिजन पार्क परिसरात आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांना माहिती दिली. त्यांनीही तातडीने घटनास्थळ गाठून घटनेची माहिती इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
घटनास्थळी पोहोचलेल्या विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले; पण तोपर्यंत मोठ्या प्रमाणात वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडले होती. घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे.
यंदाची तिसरी घटना
हनुमान टेकडी परिसरात आग लागल्याची ही यंदाच्या वर्षीची तिसरी घटना आहे.
या परिसरात रात्रीच्या सुमारास गांजा, दारू शौकिनांचा डेरा असतो. परंतु, पोलीस प्रशासनातील अधिकारी या आंबट शौकिनांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात.
साटोडा चौक परिसरात ‘दी बर्निंग कार’
रिंगरोडवरील साटोडा चौक परिसरात भरधाव असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला. वाहनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच कारचालक वेळीच वाहनाबाहेर पडला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला; पण संपूर्ण कार जळून कोळसा झाली. गिरीश शर्मा असे कारचालकाचे नाव असून तो कांदिवली मुंबई येथील रहिवासी आहे. गिरीश शर्मा हे यवतमाळवरून नागपूरच्या दिशेने एम. एच. ०४ टी.एस.५०४६ क्रमांकाच्या कारने जात असताना ही घटना घडली.
शास्त्री चौकातील तीन टपऱ्या जळाल्या
वर्धा शहरातील शास्त्री चौक परिसरात रविवारी रात्री उशीरा लागलेल्या आगीत तीन टपऱ्या जळाल्या. आग लागल्याचे निदर्शनास येताच न.प.च्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत श्रीवास्तव यांच्या मालकीची टपरी तसेच शेजारी असलेल्या गॅस वेल्डिंगच्या व इतर दुसºया दुकानातील साहित्य जळून कोळसा झाल्याने सदर तिन्ही छोट्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.