जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजनचा स्टॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:53 AM2017-08-14T00:53:35+5:302017-08-14T00:53:57+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आॅक्सिजन अभावी रुग्णाचा जीव जाण्याची स्थिती नसल्याचे रविवारी लोकमतच्यावतीने राबविण्यात आलेल्या स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून दिसून आले आहे.
प्रशांत हेलोंडे, महेश सायखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आॅक्सिजन अभावी रुग्णाचा जीव जाण्याची स्थिती नसल्याचे रविवारी लोकमतच्यावतीने राबविण्यात आलेल्या स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून दिसून आले आहे. रुग्णालयात मुबलक प्रमाणात आॅक्सिजनसाठा उपलब्ध असून रुग्णांना त्यांच्या खाटेपर्यंत सेंट्रलाईज प्रकारातून आॅक्सिजन पुरविण्यात येत असल्याचे चित्र येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दिसून आले. शिवाय येथे दाखल होणाºया रुग्णांना औषधीकरिता भटकंती करण्याची वेळही नसल्याचे दिसून आले. सामान्य रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचे दिसून आले. औषधासंदर्भात हीच स्थिती संपूर्ण जिल्ह्यात असल्याचे दिसले.
शासकीय सामान्य रुग्णालयात आॅक्सीजन नसल्याने उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे ६३ मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यामुळे सर्वत्र खळबळ माजली. हा प्रकार घडल्याने वर्धेतील जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थिती जाणून घेण्याकरिता लोकमतच्यावतीने स्टींग आॅपरेशन राबविण्यात आले. या स्टींग आॅपरेशनमध्ये वर्धेतील रुग्णालयात आॅक्सीजनची कुठलीही कमतरता नसल्याचे दिसून आले. शिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना आॅक्सीजन पुरविण्याकरिता सेंट्रलाईज पद्धत अंमलात आणल्याचे दिसून आले. या प्रकारातून रुग्णालयात गरज असलेल्या प्रत्येक रुग्णाला त्याच्या खाटेवरच आॅक्सीजन मिळत असल्याचे दिसून आले.
प्रिस्क्रीप्शनमुक्त जिल्ह्यामुळे मुबलक औषधीसाठा
प्रिस्क्रीप्शनमुक्त जिल्हा असला तरी जिल्ह्यातील काही रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रुग्णांना बाहेरून औषधी लिहून देण्याचा प्रकार करतात. असे असले तरी सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशी औषधी उपलब्ध आहे. यामुळे शासकीय सेवा घेणाºया रुग्णांना औषधासाठी भटकंती करण्याची वेळ नसल्याचे दिसले. सध्या साथीचे आजार असल्याने त्या संबधित औषधसाठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रत्येक खाटेपर्यंत पोहोचले आॅक्सिजन
वर्धेतील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि उपजिल्हा रुग्णालयात प्रयेक खाटेपर्यंत सेंट्रलाईज आॅक्सिजन पद्धत अंमलात आणण्यात आली आहे. या पद्धतीमुळे रुग्णालयातील प्रत्येक खाटेपर्यंत आॅक्सिजन पोहोचविण्यात आल्याचे दिसून आले आहे. गरज असलेल्या रुग्णाला कोणत्याही खाटेवर झोपविल्यास त्यांना आॅक्सिजन मिळणे शक्य असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील आरोग्य सेवा पुरविणाºया सर्वच संस्थेत मुबलक प्रमाणात आॅक्सिजन साठा उपलब्ध आहे. वर्धेत वेळ पडली तरी उत्तरप्रदेशाची स्थिती होणार नाही, याची खात्री आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात छोटे आणि मोठे, असे एकूण २०० सिलिंडर कोणत्याही क्षणी उपलब्ध असतात. ते रिकामे होताच मागणी करण्यात येते. या मागणीनुसार जिल्ह्याला ते पुरविण्यात येत आहे. यामुळे घाबरण्याची गरज नाही.
- डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक़
आठवड्यातून दोन वेळा केली जाते मागणी
जिल्हा सामान्य रुग्णालयात आॅक्सिजनची दर आठवड्यात मागणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या मागणीपोटी आठवड्याला २० मोठे आणि २५ छोटे सिलिंडर पुरविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील सिलिंडर मागणीनुसार उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचेही रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
छोटे-मोठे मिळून २०० आॅक्सिजन सिलिंडर
जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठे आणि छोटे, असे एकूण २०० आॅक्सिजन सिलिंडर आहे. यात जम्बो म्हणून नोंद असलेले १०० आणि लहान १०० सिलिंडरचा समावेश आहे. यातील मोठे सिलिंडर सेंट्रलाईज प्रोसेसकरिता वापरण्यात येत आहेत. तर छोटे सिलिंडर आॅपरेशन थेटर आणि आयसीयुमध्ये तसेच रुग्णाला बाहेर हलविण्याकरिता वापरले जातात. शिवाय छोटे सिलिंडर रुग्णवाहिकेतही वापरले जात असल्याची माहिती सामान्य रुग्णालयातून देण्यात आली.
मोठ्या सिलिंडरमध्ये ७ क्युबिक म्हणजेच ६ हजार लिटर आॅक्सिजनचा साठा असतो आणि लहान सिलिंडरमध्ये १.५ क्युबिक म्हणजेच १५०० लिटर आॅक्सिजन असल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात आठवड्यात दोन मोठे आणि तीन लहान सिलिंडर रिकामे होतात. सिलिंडर खाली होताच पुन्हा मागणी केली जाते व ते रुग्णालयात पुरविण्यात जात असल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली आहे.