शहरातील विकासाची वाटचाल मंदगतीने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:02+5:30
शहरातील विविध भागात भूमिगत गटार योजना, अमृत योजना, आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत, आर्वी नाका ते धंतोली चौकापर्यंत रस्ता सिमेंटीकरण, पुतळ्यांचे सौंदर्यीकरण, नाल्यांचे बांधकाम, पथदिवे उभारणी आदी अनेक कामे मागील एक ते दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहेत. अमृत आणि भूमिगत योजनेमुळे तर संपूर्ण शहरच बकाल झाले असून अनेक ठिकाणी नागरिकांची वहिवाट ठप्प झाल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटूनही शहरातील सर्वच विकासकामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा आणि जिल्हा प्रशासनाच्या डुलक्या याला कारणीभूत असून यामुळे नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.
शहरातील विविध भागात भूमिगत गटार योजना, अमृत योजना, आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत, आर्वी नाका ते धंतोली चौकापर्यंत रस्ता सिमेंटीकरण, पुतळ्यांचे सौंदर्यीकरण, नाल्यांचे बांधकाम, पथदिवे उभारणी आदी अनेक कामे मागील एक ते दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहेत. अमृत आणि भूमिगत योजनेमुळे तर संपूर्ण शहरच बकाल झाले असून अनेक ठिकाणी नागरिकांची वहिवाट ठप्प झाल्याचे चित्र आहे. भूमिगत गटार आणि अमृत योजनेकरिता सुस्थितीत रस्त्यांचे युद्धस्तरावर फोडकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी फार मोठ्या कालावधीपासून केवळ खड्डे खोदून ठेवण्यात आले असून रहदारीकरिता जीवघेणे ठरत आहेत. दादाजी धुनिवाले चौक ते आर्वी नाका आणि पुढे पावडे चौकापर्यंत रस्त्यानचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण पूर्णत्वास गेले. मात्र, धंतोलीपर्यंतच्या रस्त्याचे काम रखडले आहे. या कामाची मुदतदेखील संपुष्टात आली आहे.
तर आर्वी मार्गालगत वर्षभरापासून नालीचे धिम्यागतीने काम सुरू असून झालेले बांधकाम पूर्णत: सदोष आहे. महत्त्वपूर्ण आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलालादेखील संथपणाचे ग्रहण लागले आहे. शहराच्या वैभववात भर घालणाऱ्या, इतिहासाची साक्ष देणाºया छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरणही अर्धवटच आहे. नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे कामही चार वर्षांपासून कासवगतीने होत आहे. अनेक ठिकाणी पथदिव्यांची उभारणी झाली; मात्र, दिवे अद्या सुरू झालेले नाहीत. तर वाहतूक नियंत्रक दिवेही दोन वर्षांपासून डोळे मिटून आहते. ही यंत्रणादेखील अद्याप कार्यान्वित झालेली नाही. विकासकामांची अशी कासवगतीने वाटचाल सुरू असताना देखरेखीची जबाबदारी असलेली यंत्रणा काय करीत आहे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. संथगतीने होत असलेल्या कामांचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने विकासकामांचा आढावा घेत गती देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
‘त्या’ रस्त्याची चौकशी नाहीच
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका चौकापर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. मात्र या रस्त्याचे बांधकाम पूर्णत: सदोष झालेले आहे. रस्ता बांधकामापूर्वी भूमिगत गटार योजनेचे चेंबर तयार करण्यात आले. मात्र, रस्ता बांधकाम चेंबरला समांतर करण्यात आले नाही. परिणामी रस्त्यावर चेंबर कुठे खाली तर कुठे वर आलेले असून अपघातांना आमंत्रण देणारे ठरत आहे. या रस्ता बांधकामाची सखोल चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
विकासाला ब्रेक तर लागणार नाही..!
राज्यात सत्तापरिवर्तन होताच तत्कालीन भाजप सरकारने हाती घेतलेल्या प्रकल्पांना स्थगिती दिली जात असून घेतलेले निर्णयही रद्द केले जात आहेत. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेली कामे आहेत. ही विकासकामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने यांनाही ब्रेक तर लागणार नाही ना, अशी चर्चा वर्धेकर नागरिकांत सुरू आहे.