पंचायत समितीला इमारत नवीन, पण रस्ता जुनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:29 PM2017-11-19T23:29:25+5:302017-11-19T23:29:46+5:30
स्थानिक पंचायत समितीची जुनी वास्तू पाडून नवीन टोलेजंग व अद्यावत वास्तू बांधण्यात आली. वास्तूचे काम जवळपास पूर्ण झाले आहे; ....
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : स्थानिक पंचायत समितीची जुनी वास्तू पाडून नवीन टोलेजंग व अद्यावत वास्तू बांधण्यात आली. वास्तूचे काम जवळपास पूर्ण झाले आहे; पण या इमारतीकडे जाणाºया रस्त्याचे अद्यापही बांधका करण्यात आले नाही. यामुळे खा. रामदास तडस यांनी या रस्त्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सुमारे ४ कोटी रुपयांचा खर्च करून कारंजा पंचायत समितीची इमारत बांधण्यात आली आहे. भले मोठे सभागृह, सभापती, उपसभापती कक्ष तसेच कृषी आस्थापना, विस्तार अधिकारी कक्ष, प्रसाधन गृह, अभियंता कक्ष, अंतर्गत विद्युत फीटींग, टाईल्स, सॅनेटरी, प्लंबींग सर्व प्रकारची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री वा मोठ्या मंत्री महोदयांच्या इमारतीचे लोकार्पण अपेक्षित आहे. इमारत आकर्षक झाली आहे; पण या इमारतीमध्ये ये-जा करण्यासाठी असलेला रस्ता तयार करण्यात आला नाही. सद्यस्थितीत जुना रस्ता अत्यंत खराब झाला आहे. वाहने तर सोडा, साधे पायी चालणेही कठीण झाले आहे. वास्तूसोबत रस्ताही होणार, अशी अपेक्षा पदाधिकारी व नागरिकांना होती; पण वास्तूचा खर्च अपेक्षेपेक्षा अधिक झाल्याने रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. सदर रस्ता जवळपास ६० फुट रूंद आणि १५० फुट लांब रस्ता आहे. सिमेंटचा रस्ता बांधायचा झाल्यास २५ लाख रुपयांचे बजेट आहे. खा. तडस यांना निवडून देण्यात कारंजा तालुका वासियांचा मोठा सहभाग आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. खासदारांना दरवर्षी मोठा निधी मिळतो. त्यातून या सिमेंट रस्त्याचे बांधकाम करून द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
नागरिक तालुक्यातील भाजप नेत्यांकडे या कामासाठी आग्रह धरीत आहे. पं.स. सभापती मंगेश खवशी, भाजपा तालुकाध्यक्ष मुकूंद बारंगे, ज्येष्ठ कार्यकर्ते हरीभाऊ धोटे, माजी आमदार केचे या रस्त्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी खा. तडस यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. हा रस्ता झाल्यास पंचायत समितीमध्ये ये-जा करण्याचा मार्ग सुकर होणार आहे. पं.स. मध्ये वाहने जाऊ शकणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.