नानावटीत पंकज भोयर यांचा अहवाल निगेटिव्ह; प्रकृती स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:36 IST2020-08-31T11:36:23+5:302020-08-31T11:36:44+5:30
मुंबईमध्ये आमदार डॉक्टर पंकज भोयर यांची चाचणी केल्यावर तेथे अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता केवळ इंन्फेक्शन संदर्भात डॉ. अब्दूल अन्सारी हे उपचार करीत असून प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

नानावटीत पंकज भोयर यांचा अहवाल निगेटिव्ह; प्रकृती स्थिर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील आमदार डॉक्टर पंकज भोयर यांना कोरोनाची लागण झाली असतानाच घशात आणि फुफ्फुसामध्ये इंन्फेक्शन झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ सावंगी रुग्णालयातून रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मुंबईच्या नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असून यादरम्यान केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याने दोन दिवसात त्यांना सुटी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आमदार डॉ. भोयर यांचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरु असतानाच त्यांच्या घशात आणि फुफ्फुसामध्ये इंन्फेक्शन झाल्याने उपचार करुनही आराम पडत नव्हता. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचाराकरिता नानावटी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना मुंबईला हलविले त्याच दिवशी सावंगी रुग्णालयातील दुसरा अहवाल निगेटिव्ह आला. पण, मुंबईमध्येही त्यांची चाचणी केल्यावर तेथेही अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता केवळ इंन्फेक्शन संदर्भात डॉ. अब्दूल अन्सारी हे उपचार करीत असून प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
आमदारांचे भावनिक आवाहन
वर्ध्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे काळजी वाटत आहे. कारण कोरोनाची तीव्रता मी स्वत: अनुभवत आहे. मी बाधित झाल्याचे कळल्यानंतर माझ्यापेक्षा माझ्या संपर्कातील व्यक्तींचे कसे, याची चिंता वाटायला लागली. वेळेत मी स्वत: क्वारंटाईन करुन घेतल्याने संसर्ग टळला. पण, विनाकारण घराबाहेर पडू नका, नियमांचे पालन करुन गर्दी करणे टाळा. प्रशासनावर आधीच ताण आहे तो आणखी न वाढविता त्यांना सहकार्य करा. कोरोनाबाधित होणे कुठलाही गुन्हा नसून रुग्णांना चांगली वागणूक देवून त्यांचे मनोबल वाढवा, आपले सहकार्यच बाधितांसाठी प्रभावी औषध म्हणून कार्य करते, असे भावनिक आवाहन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केले आहे.