खासगी शाळांकडून होतेय पालकांची लूट
By admin | Published: June 13, 2015 02:15 AM2015-06-13T02:15:59+5:302015-06-13T02:15:59+5:30
खासगी शाळांत वेगवेगळ्या नावाखाली शुल्क आकारून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. यामुळे आता ग्रामीण पालक जि.प. शाळांकडे वळल्याचे दिसते.
आकोली : खासगी शाळांत वेगवेगळ्या नावाखाली शुल्क आकारून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. यामुळे आता ग्रामीण पालक जि.प. शाळांकडे वळल्याचे दिसते.
मागील पाच ते सहा वर्षांपासून ग्रामीण पालकांमध्ये कॉन्व्हेंटचे वेड होते. जि.प. शाळांचा खालावलेला शैक्षणिक दर्जा, शिक्षकांतील राजकीय स्पर्धा व त्यातून विद्यार्जनाकडे होणारे दुर्लक्ष हे त्यामागील कारणे होती. पालक जि.प. शाळेपासून दुरावले होते. परिणामी, जि.प. शाळांना गळती लागली होती; पण आता हळूहळू जि.प. शाळांना सुगीचे दिवस येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कॉन्व्हेंट संस्कृती रूजेपर्यंत त्या शाळांनी शुल्क आवाक्यात ठेवले होते; पण कॉन्व्हेंट संस्कृती रूजताच पालक झुंडीने कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घ्यायला लागले, शाळा व्यवस्थापकांनी आपले खरे रूप पूढे केले. पूर्वी आवाक्यात असणारे शाळांचे शुल्क वाढविण्यात आले. प्रवेश फी, प्रवासभाडे यात वाढ करण्यात आली. वह्या पुस्तके शाळेतून घेणे बंधनकारक केले. टी-शर्ट सारखी वस्तूही बाहेरून खरेदी न आम्ही म्हणतो त्याच भावात खरेदी करा, हा अट्टहास आल्याने पालकांत नाराजी पसरली आहे. प्रारंभी मृगजळ ठरलेले कॉन्व्हेंट पालकांना आता ओझे वाटत आहे. यामुळे या सत्रात अनेक पालकांनी कॉन्व्हेटमध्ये पाल्यांचा प्रवेश निश्चित केला नसल्याने जि.प. शाळांची पटसंख्या वाढण्याची चिन्हे बळावली आहेत.(वार्ताहर)