बालकांना घडविण्याची जबाबदारी आईवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:09 AM2018-01-01T00:09:51+5:302018-01-01T00:10:59+5:30
आईची थोरवी महान आहे. आई या शब्दात सामर्थ्य आहे. श्यामची आई यशोदाला म्हणाली, पायाला घाण लागायला नको. तेव्हा यशोदा म्हणते, श्याम मनालाही घाण लागता कामा नये.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : आईची थोरवी महान आहे. आई या शब्दात सामर्थ्य आहे. श्यामची आई यशोदाला म्हणाली, पायाला घाण लागायला नको. तेव्हा यशोदा म्हणते, श्याम मनालाही घाण लागता कामा नये. गोष्ट छोटी आहे; पण आईचा सहवास व विचारातून साने गुरुजी घडले, हे लक्षात घेतले पाहिजे. आई शिल्पकार आहे. भौतिक युगात बालकांना घडविण्याची जबाबदारी आईवरच आहे, असे मत डॉ. सुनीता कावळे व्यक्त केले.
अ.भा. साने गुरूजी कथामालेच्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. पदमरेखा धनकर वानखेडे, प्रा.डॉ. शोभा रोकडे, डॉ. शोभा बेलखोडे, अवधूत म्हमाणे उपस्थित होते. ‘आई महात्म्य’, हा चर्चासत्राचा विषय होता.
डॉ. कावळे पूढे म्हणाल्या की, छ. शिवाजी महाराजांना स्वराज्याची पे्ररणा आईपासून मिळाली. मार्गदर्शन, दिशा व खंबीरपणे त्या महाराजांच्या मागे होत्या. महात्मा फुले व सावित्रीबार्इंना मारायला मारेकऱ्यांना मला मारा; पण अनाथ मुलांची जबाबदारी घ्या, असे म्हणताच मारेकरी माघारी फिरले. विनोबांनी आईच्या इच्छेमुळे मराठीत गीताई लिहिली. साने गुरुजींनी तर आईचे हृदय घेऊनच लिखाण व कार्य केले, असे सांगितले. याप्रसंगी प्रा.डॉ. रोकडे, डॉ. धनकर वानखेडे यांनीही विचार व्यक्त केले.
संचालन प्रा. अमृत येऊलकर यांनी केले तर आभार प्रा.डॉ. गजानन कोटेवार यांनी मानले. याप्रसंगी प्रा. राजेंद्र मुंढे, प्रदीप दाते व प्रा. येऊलकर यांचा खादी शाल देऊन जयवंत मठकर यांनी सत्कार केला. खुली चर्चा व मनोगताचा समारोप अवधूत म्हमाणे यांच्या अध्यक्षतेत झाला. अरुण गाठे, पटने, बाल सरोदे, विरुळकर, गडकरी यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांनी सहकार्य करून गुरुजींचे कार्य पूढे नेण्याचे आवाहन म्हमाणे यांनी केले. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.