वर्दळीचे रस्तेच झालेत वाहनतळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:10 PM2019-04-01T23:10:07+5:302019-04-01T23:10:25+5:30
मोदींच्या सभेकरिता जिल्हाभरातून चारचाकी वाहनांच्या माध्यमातून नागरिक शहरात दाखल झाले. या वाहनांनी चक्क रस्त्यांवरच कब्जा केल्याने रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप आले होते, तर वाहनतळाची नियोजित ठिकाणे रिकामीच पाहायला मिळाली. या प्रकारामुळे शहरातील विविध मार्गांवर वाहतूकव्यवस्था कोलमडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मोदींच्या सभेकरिता जिल्हाभरातून चारचाकी वाहनांच्या माध्यमातून नागरिक शहरात दाखल झाले. या वाहनांनी चक्क रस्त्यांवरच कब्जा केल्याने रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप आले होते, तर वाहनतळाची नियोजित ठिकाणे रिकामीच पाहायला मिळाली. या प्रकारामुळे शहरातील विविध मार्गांवर वाहतूकव्यवस्था कोलमडली.
नरेंद्र मोदी यांची स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर सभा आयोजित होती. याकरिता वाहनतळाची व्यवस्था न्यू इंग्लिश हायस्कूलचे मैदान, सर्कस मैदान, शितलामाता मंदिराचे प्रांगण आदी ठिकाणी आयोजकांकडून करण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध भागांतून नागरिक सकाळपासूनच वर्ध्यात दाखल झाले. दरम्यान आर्वी मार्गावर चारचाकी वाहनांची लांबच लांब रांग लागलेली होती. आर्वी नाका चौकात पाच रस्त्यांचा संगम झालेला आहे. आर्वी अखंडितपणे वाहने येत असल्याने या चौकात वाहतुकीचा बराच काळ खोळंबा झाला.
नियोजित ठिकाणी असलेले वाहनतळ आणि सभास्थळ यात मोठे अंतर असल्याने चारचाकी वाहनधारकांनी शहरात जागा मिळेल तेथे आणि रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली. स्वावलंबी विद्यालय परिसरातील मार्ग आणि बॅचलर रोडच्या दुतर्फा केवळ चारचाकी वाहनेच दिसून येत होती. यामुळे वाहनतळे रिकामीच होती. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.
अडीच ते तीन किलोमीटर पायपीट
मोदींच्या सभेकरिता आलेली वाहने सभास्थळापर्यंत वाहतूक आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी जाऊ दिली नाही. यामुळे सेलू तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांनी धुनिवाले चौक परिसरातच वाहने उभी करून रखरखत्या उन्हात पायी वारी सुरू केली. मुख्य प्रवेशद्वार गर्जना चौक ते श्रीनिवास मार्गाकडून असल्याने सभास्थळापर्यंत नागरिकांनीचक्क अडीच ते किलोमीटर पायपीट केली. सभा संपत असताना नागरिकांची पायपीट सुरूच होती.