जमाखर्चाचा पवनार पॅटर्न जिल्ह्यात राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 10:30 PM2019-01-03T22:30:58+5:302019-01-03T22:33:09+5:30
जिल्ह्याच्या दौऱ्यावर २०१८ मध्ये आलेल्या पंचायत राज समितीला पवनारचे सरपंच अजय गांडोळे यांनी मागील ३ वर्षांच्या जमाखर्चाची विवरण पुस्तिका सादर केली. या समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी या कामाचे कौतुक केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्याच्या दौऱ्यावर २०१८ मध्ये आलेल्या पंचायत राज समितीला पवनारचे सरपंच अजय गांडोळे यांनी मागील ३ वर्षांच्या जमाखर्चाची विवरण पुस्तिका सादर केली. या समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी या कामाचे कौतुक केले. एखादी ग्रामपंचायत असे काम करू शकते, तर संपूर्ण जिल्ह्यात हे काम का होऊ शकत नाही, अशी विचारणा करून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सदर उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याबाबत निर्देश दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेने गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व ग्रामपंचायतींना याबाबत पत्र दिले व असा उपकम राबविण्याबाबत सूचना केली आहे.
पवनार ग्रामपंचायतीने सन २०१४-१५ पासून दरवर्षी ग्रामपंचायतमार्फत गावात केल्या जाणाऱ्या विकास कामांवर झालेला खर्च तसेच ग्रामपंचायतीचा दैनंदिन खर्च नागरिकांना कळावा, याकरिता पुस्तिका छापून त्याचे वितरण गावात करण्याची परंपरा सुरू केली. सरपंच अजय गांडोळे यांनी या कामात पुढाकार घेतला. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी ही विदर्भातील पहिली ग्रामपंचायत आहे. राज्याच्या आदर्श गाव योजना समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनीही पवनार ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाची प्रशंसा केली होती. पवनार ग्रामपंचायतीत सध्या सरपंचाशिवाय एकही सदस्य पदावर नाही. प्रशासक व ग्रामविकास अधिकारी सरपंचाच्या नेतृत्वात काम पाहत आहे. यावर्षी चौथ्यांदा ग्रामपंचायतीने खर्चाची पुस्तिका प्रकाशित केली. जिल्ह्याच्या दौऱ्यावर पंचायतराज समिती आली असतांना पवनार ग्रामपंचायतीचा हा उपक्रम पाहून सदर उपक्रम जिल्हाभर राबविण्याबाबत सूचना केली. त्यानंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती, वर्धा यांनी ३ मे रोजी पत्र काढून वर्धा पंचायत समितीतंर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींनी वार्षिक खर्चाचा अहवाल करदात्या ग्रामस्थांना अहवाल स्वरूपात द्यावा, असे निर्देश सरपंच, सचिव यांना दिले. इतर तालुक्यातही असे पत्र ग्रामपंचायतींना देण्यात आल्याची माहिती सरपंच गांडोळे यांनी दिली. पवनारचा हा खर्च पॅटर्न जिल्हाभर राबविला जाण्याची शक्यता आहे. पवनार गावात सेवाग्राम विकास आराखड्यातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली आहे. त्यामुळे नदीघाट, नंदीखेडा, व गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे. यामागे सरपंचाचा पाठपुरावा कारणीभूत आहे.