हिंसाचार डाव्यांच्या तत्वज्ञानाचा भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:26 PM2017-12-12T22:26:42+5:302017-12-12T22:27:49+5:30

देशातील कम्युनिस्टांचा हिंसाचार हा त्यांच्या तत्वज्ञानाचा भाग आहे. बंगालमध्ये ३२ वर्षांच्या राजवटीत ५५ हजार ४०८ खून झालेत.

Part of the philosophy of violence left | हिंसाचार डाव्यांच्या तत्वज्ञानाचा भाग

हिंसाचार डाव्यांच्या तत्वज्ञानाचा भाग

Next
ठळक मुद्देमाधव भंडारी : जलसंधारणाच्या कामासाठी माधव कोटस्थाने यांचा सत्कार

आॅनलाईन लोकमत
वर्धा : देशातील कम्युनिस्टांचा हिंसाचार हा त्यांच्या तत्वज्ञानाचा भाग आहे. बंगालमध्ये ३२ वर्षांच्या राजवटीत ५५ हजार ४०८ खून झालेत. त्रिपुरा, केरळ व बंगाल या तीन राज्यांमध्ये राजकीय हिंसाचारात जेवढे लोक मारल्या गेले तेवढे जवानही १९४८ पासून ते डोकलामच्या युद्धापर्यंत शहीद झाले नाहीत. एवढा टोकाला गेलेला हिंसाचार कम्युनिस्टांच्या राज्यात सुरू आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ता माधव भंडारी यांनी केला. ओ पॉझिटिव्ह फाऊंउेशनच्यावतीने मंगळवारी ‘डाव्यांचा केरळातील हिंसाचार’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जेठानंदन राजपूत होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे प्रदेश महामंत्री व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. रामदास आंबटकर, रवींद्र चव्हाण, माधव कोटस्थाने उपस्थित होते. माधव भंडारी पुढे म्हणाले की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला मिळालेला कौल अनेकांना पचविता आलेला नाही. जनमताच्या कौलानंतर वैचारिक आणि सामाजिक लढाई सुरू झाली. या यशाचे श्रेय संघ परिवार, भाजप व नरेंद्र मोदी यांना न देता अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा ठेका घेतलेले लोक विशेषत: डावी मंडळी ईव्हीएममुळे हा विजय मिळाला, असा कांगावा करीत आहे. डाव्या विचारसरचणीचा बोलघेवडा वर्ग आहे. यंदा रशियन राज्यक्रांतीला १०० वर्ष झाले. हेच वर्ष इंदिरा गांधी व पंडित दिनदयाल उपाध्याय यांचे ही शताब्दी वर्ष आहे. १९२५ मध्ये कम्युनिस्ट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. डाव्या संघटनांचे काम आता अंतिम टप्प्यात निर्णायक स्थितीत आले आहे. डाव्यांचा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नाही. केरळ हे आयुर्वेद, देवोभूमी व शिक्षण क्षेत्रात भरारी घेतलेले राज्य आहे. येथूनच ख्रिश्चन धर्म प्रसाराचे काम पहिल्यांदा सुरू झाले. पहिली मशिदही येथेच बांधली गेली.
१९५७ मध्ये केरळात मतपेटीच्या माध्यमातून डाव्यांचे सरकार निवडून आले. मात्र तरीही त्यांनी विकासाचे तत्वज्ञान स्वीकारले नाही. अराजक घडवून त्याआधारे सत्ता बळकाविण्याचा कार्यक्रम डाव्यांनी सुरू ठेवला. केरळमध्ये २००० ते २०१५ या कालावधीत २६९ राजकीय खून झाले. ४० भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. मात्र, डाव्यांच्या या हिंसाचारा विरोधात माध्यम कधीही भूमिका घेत नाही. काँग्रेसनेही डाव्यांचे हे तत्वज्ञान मान्य केले आहे. त्यामुळेच डावी मंडळी काँग्रेसला बॅकअप देण्याचे काम करीत असते. अत्यंत अमानुषपणे या हत्या करण्यात आल्या.
नक्षलबारी गावात कनुसंघाल याने नक्षलवादी चळवळीची सुरूवात केली. कम्युनिस्टांनी कसणाºयाला जमीन देण्याचे धोरण स्वीकारल्याने गरीब वर्ग प्रस्थापित होता कामा नये, अशी माओवाद्यांची भूमिका होती. माणुस सुखी झाला तर कम्युनिस्ट विचार स्वीकारणार नाही, अशी भीती असलेल्या या लोकांनी नेहमीच हिंसाचाराचे समर्थन केले व झुंडीचे राजकारण करण्याचे काम त्यांनी केले. डाव्या विचारसरणीचे लोक भ्रष्टाचारातही आघाडीवर आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमात जलसंधारणात उत्कृष्ट काम केल्याबद्दल माधव कोटस्थाने यांचा भंडारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन श्रीधर देशमुख यांनी केले. उपस्थितांचे आभार रवींद्र चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्यासह संघ परिवारातील ज्येष्ठ सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मणीशंकर अय्यर यांची चिनी सैनिकाला मदत
१९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाने चीनचे समर्थन केले होते. त्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पॉलिट ब्युरोच्या ३९ नेत्यांना तुरूंगात टाकले. त्यावेळी व्ही.एस. अच्युतानंदन यांनी डाव्यांनी सैनिकांसाठी रक्तदान करावे, अशी भूमिका मांडली होती. मात्र त्यांची राष्ट्रीय स्तरावरून जिल्हास्तरावर नियुक्ती करण्यात आली. तर याच युद्धाच्यावेळी कॅम्ब्रीज विद्यापीठात शिक्षण घेत असलेले मणीशंकर अय्यर यांनी चिनी सैनिकाला पैसे पाठविण्याचे काम केले, अशी माहिती व्याख्यानात माधव भंडारी यांनी दिली. १९७५ मध्ये देशात इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. त्यात सिद्धार्थ शंकर रे यांनी वैचारिक मांडणी केली. असेही ते म्हणाले. १९७७ च्या निवडणुकीत कम्युनिस्ट उमेदवारांसाठी रशियातून पैसा आला होता, असा दावाही केला.

Web Title: Part of the philosophy of violence left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.