शिंदे-फडणवीस सरकारच्या 'आनंद शिधा किट'चा रोहण्यात उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 02:00 PM2022-10-27T14:00:04+5:302022-10-27T14:05:58+5:30
१०० रुपये घेऊन माथी मारले अर्धवट साहित्य : उर्वरित साहित्यासाठी सर्वांचेच मौन
रोहणा (वर्धा) : समाजातील दुर्बल घटकांचीही दिवाळी आनंदात जावी या हेतूने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने गरजूंना अवघ्या १०० रुपयांत आनंद किट देण्याचे जाहीर केले. पण याच आनंद किट वाटपाचा राेहणा परिसरात फज्जाच उडाला आहे. शिधापत्रिका धारकांकडून स्वस्त धान्य दुकानदारांनी १०० रुपये घेत अर्धवटच साहित्य माथी मारल्याचे वास्तव आहे. तर उर्वरित साहित्य केव्हा मिळेल अशी विचारणा लाभार्थ्यांकडून केल्यावर मौनच बाळगले जात आहे. परिणामी शासकीय योजनेच्या लाभास पात्र ठरलेल्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.
दिवाळीपूर्वी शासनाच्या वतीने गरजूंसाठी अवघ्या १०० रुपयांत साखर, तेल, चणा डाळ व रवा या वस्तूंची किट देण्याचे जाहीर करण्यात आले. पण रोहणा परिसरातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांत केवळ तेल आणि साखर या दोनच वस्तूचा पुरवठा झाला. परिणामी स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांना तेल व साखर या दोनच वस्तूंचे वितरण करून प्रत्येकी १०० रुपये वसूल केले. दोन वस्तू दिल्या पण उर्वरित वस्तू केव्हा देता अशी विचारणा केल्यावर उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहे.
आम्हाला दोनच वस्तूंचा पुरवठा झाल्याने त्याच वस्तूंचे वितरण केले. प्रत्येक वस्तूची स्वतंत्र किंमत न ठरल्याने दोन वस्तूचे ग्राहकांकडून १०० रुपये घेण्यात आले. उर्वरित वस्तू आल्यावर ग्राहकांना कुठल्याही रक्कम न घेता वितरित केल्या जाईल.
- पंकज नायसे, स्वस्त धान्य दुकानकार, बोथली.
मला साखर व तेल स्वस्त धान्य दुकानातून मिळाले. त्यासाठी दुकानदाराने १०० रुपये घेतले. उर्वरित वस्तूंबाबत विचारणा केल्यावर वस्तू आल्यावर देण्यात येईल असे सांगण्यात आले.
- विनोद कडू, लाभार्थी, रोहणा.