पुलगाव-आर्वी रेल्वे मार्गाबाबत शासनाकडून पक्षपात
By Admin | Published: August 22, 2016 12:44 AM2016-08-22T00:44:03+5:302016-08-22T00:44:03+5:30
मध्य प्रांतातील कापूस उत्पादक भाग म्हणून पुलगाव, हिंगणघाट, आर्वीचे महत्व आहे. याच भागात व्यापाराच्या दृष्टीकोनातून इंग्रजांनी पुलगाव,
रेल्वे मिशन समितीचा आरोप : पुलगाव-आर्वी व मूर्तिजापूर-यवतमाळ दोन्ही रेल्वे मार्ग निक्सन अॅण्ड कंपनीचेच
पुलगाव : मध्य प्रांतातील कापूस उत्पादक भाग म्हणून पुलगाव, हिंगणघाट, आर्वीचे महत्व आहे. याच भागात व्यापाराच्या दृष्टीकोनातून इंग्रजांनी पुलगाव, आर्वी, अचलपूर, मूर्तिजापूर, यवतमाळ हा नॅरोगेज रेल्वे मार्ग निर्मित केला. येथूनच वऱ्हाडाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. स्वातंत्र्यानंतर या दोन्ही नॅरोगेज मार्गाचा निक्सन अॅड. कंपनीशी दर दहा वर्षांनी सुरू ठेवण्याचा करार भारत सरकारला करावा लागत होता. यामुळे या मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रूपांतर व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. यातच केंद्र शासनाने अचलपूर, यवतमाळ रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी १५०० कोटी रुपये दिले; मात्र पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वे मार्ग बंद केला. या मार्गाबाबत शासनाने पक्षपात केल्याचा आरोप १०० कि.मी मीटर रेल्वे मिशन समितीने केला आहे.
येथील एका भवनात १०० कि.मी मोटर रेल्वे मिशन समितीची सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर शहाकार होते. सभेत मिशनचे प्रकाश साकडे (रोहणा), प्रशांत सव्वालाखे, गौरव जाजू, श्रीकांत वाघमारे, सुनील राठी, अॅड. अवतार सिंग, बाबासाहेब गलाट, प्रमोद बोराटणे आदींनी विचार व्यक्त केले. १९१६ साली ब्रिटिशांनी या भागातील कापूस उत्पादकाचे महत्त्व लक्षात घेता पुलगाव-आर्वी ही नॅरोगेज रेल्वे सुरू केली. या ३५ किमीच्या रेल्वेमुळे पुलगाव-आर्वी दरम्यान रोहणा, विरूळ, सोरटा, धनोडी, पारगोठाण, पिंपळखुटासह इतर ग्रामीण परिसरातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना व दूध, दही, लोण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना सोईस्कर झाले होते.
आर्वी परिसरातील आष्टी, मोर्शी, वरूड हा परिसर संत्रा उत्पादकांचा असल्यामुळे पुलगाव-आर्वी हा नॅरोगेज रेल्वे मार्ग वरूड व पुढे आमला या सैनिकी विभागापर्यंत वाढवून पुलगाव व आमला हे दोन संरक्षण विभाग जोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यात पुलगाव, आमला व इटारशी ही संरक्षण विभागाची महत्त्वाची ठिकाणे या मार्गाने जोडल्या जाऊ शकत होती.
देश स्वातंत्र झाला. विविध राजकीय पक्षांची सरकारे आलीत व ब्रिटीशकालीन नॅरोगेज मार्गाकडे दुर्लक्ष झाले. या दोन्ही मार्गावर अनेक संकटे आलीत. त्यातून पुलगाव, आर्वी हा रेल्वे मार्ग ३१ जुलै २००६ पासून बंद झाल्याने परिसरातील १० लाख जनतेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम पडत आहे.
याच पद्धतीने चालणाऱ्या अचलपूर, मूर्तिजापूर, यवतमाळ या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी शासनाने १५०० कोटी दिले. त्याप्रमाणे पुलगाव आर्वी मार्गासाठी राशी देवून हा मार्ग आमला पर्यंत वाढवावा, अशी मागणी करण्यात आली. सभेला भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, गिरीश चौधरी, शाबिर कुरेशी, कपील शुक्ला, अॅड. अजय तिवारी, मनोज पनपालिया, मधुकर रेवतकर, आशिष गांधी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)