सेवाग्रामच्या गांधी चित्रप्रदर्शनीचे पालटणार रूपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:40 AM2017-07-20T00:40:37+5:302017-07-20T00:40:37+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्यामुळे आगळे महत्त्व असलेल्या सेवाग्राम येथील विकास कामांना आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे.
गुरूवारी शिलान्यास : कर्मचारी वसाहतीचे होणार बांधकाम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्यामुळे आगळे महत्त्व असलेल्या सेवाग्राम येथील विकास कामांना आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत आश्रम परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न आहे. याला आश्रम प्रतिष्ठाननेही मान्यता दिल्याने आता सेवाग्राम परिसरात चित्रप्रदर्शनी तसेच कर्मचाऱ्यांची वसाहत नव्याने साकारत आहे.
महात्मा गांधी आश्रम परिसरात प्रार्थना स्थळ, बा-कुटी, बापू-कुटी, आखरी निवास, रसोडा व गो-शाळा आहे. लगतच कार्यालय, शांती भवन, नई तालीम परिसर व समोर यात्री निवास तथा गांधीजींच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपदर्शनी आहे. २०१९ मध्ये महात्मा गांधींची दीडशेवी जयंती साजरी होत असल्याने विविध कामे हाती घेण्यात आली आहे. यात्री निवासाची दुरुस्ती सुरु आहे. सध्याची चित्रप्रदर्शनी हटवून नवीन तयार केली हात आहे. ती पर्यटकांना वर्षभरात पाहायला मिळेल. चित्रप्रदर्शनीची इमारत पाडून नवीन इमारत उभारली जात असून जळगावच्या धर्तीवर गांधी विचारांची चित्रप्रदर्शनी साकारण्यात येणार आहे.
यात दृकश्राव्य विभाग, ग्रामोद्योग, खादी, संस्कार, साहित्य विभाग, पार्कीग व प्राकृतिक आहार केंद्र राहणार असल्याचे आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी सांगितले. आश्रम कर्मचाऱ्यांची निवासस्थानेही नवीन होत आहेत.
सध्याचे प्राकृतिक आहार केंद्र बंद करण्यात येणार आहे. त्यांना एक महिन्याची मुदत दिली आहे. नवीन चित्रप्रदर्शनीत आहार केंद्राचाही समावेश केला आहे. गुरूवारी या कामांचा पालकमंत्री शुभारंभ करतील.
- जयवंत मठकर, अध्यक्ष, म. गांधी आश्रम प्रतिष्ठान, सेवाग्राम.