प्रवाशांचा प्रश्न; गर्दीच्या नऊ मार्गांवर बस कधी धावणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 05:00 AM2021-12-31T05:00:00+5:302021-12-31T05:00:24+5:30
निकाल देत बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्यास कामगार न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा झटका मानला जातोय. तरीही हा संप सुरूच असून जिल्ह्यात आर्वी, पुलगाव, तळेगाव, वर्धा, हिंगणघाट या ५ आगारांमध्ये २१३ बसेस आहे. दररोज ७५ हजार किलो मीटर या बसेस धावत होत्या.
राजेश सोळंकी
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून संप सुरूच आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असून सरकारने अनेक प्रस्ताव दिलेत. तरीही मागणी पूर्ण होईस्तोवर संप मागे घेणार नाही, अशी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे महामंडळाकडून जिल्ह्यातील २६३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. तर काही कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालयात धाव घेत, बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली.
यावर निकाल देत बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्यास कामगार न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा झटका मानला जातोय. तरीही हा संप सुरूच असून जिल्ह्यात आर्वी, पुलगाव, तळेगाव, वर्धा, हिंगणघाट या ५ आगारांमध्ये २१३ बसेस आहे. दररोज ७५ हजार किलो मीटर या बसेस धावत होत्या. वर्धा आगार वगळता चारही आगारात काही प्रमाणात बसेस सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण जवळपास ९ ते १० गर्दीच्या ठिकाणी बसेस जात नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.
या मार्गावर बसेस सुरू
- आर्वी- वर्धा, आर्वी- अमरावती, आर्वी -आष्टी, हिंगणघाट- वर्धा, हिंगणघाट -उमरेड, तळेगाव-वरुड,
- पुलगाव - वर्धा, आर्वी- वरुड.
या मार्गावर बसेस कधी सुरू होणार?
- आर्वी - नागपूर, यवतमाळ- नांदेड, शेगाव, मोर्शी, उमरेड, चंद्र्पूर, गडचिरोली व भंडारा.
महामंडळाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्यालयाच्या सूचनेचे पालन करून कार्यवाही करण्यात येत आहे. आतापर्यंत २६३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. जे कामावर रुजू झाले, त्या वाहक व चालक यांच्या संख्येनुसार गाड्या सोडल्या जात आहे.
चेतन हसबनीस, विभागीय नियंत्रक
एसटीने प्रवास करण्याची सवय लागते की काय?
बसेस सुरू झाल्याने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची अडचण काहीशी दूर झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरूच असल्याने अनेक जिल्ह्यांत जाणाऱ्या बसेस सुरू नाहीत. आता एसटी कर्मचाऱ्यांनी अधिक ताणून धरायला नको. नागरिकांच्या सुविधेचा विचार व्हावा.
प्रवीण शेलोकार, प्रवासी
बसेस सुरू झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र लांब पल्ल्याच्या बसेस अद्यापही बंद असल्याने प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागतोय. त्या बसेसही लवकरात लवकर सुरू व्हाव्यात.
विजय गिरी, प्रवासी