बोरधरण येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2015 02:27 AM2015-06-08T02:27:20+5:302015-06-08T02:27:20+5:30
व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झालेल्या बोरधरण अभयारण्यात येणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी असलेल्या प्रवासी निवाऱ्याची पुरती दुर्दशा झाली आहे.
सर्वत्र वाढली झुडपे : प्रवाशांना सोसावा लागतो त्रास; छत नसल्याने झाडाचाच आश्रय
सेलू : व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झालेल्या बोरधरण अभयारण्यात येणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी असलेल्या प्रवासी निवाऱ्याची पुरती दुर्दशा झाली आहे. प्रवासी निवाऱ्यात पाऊस आणि उन्हापासून वाचण्याऐवजी झाडांच्या सान्निध्यात रहावे लागते. त्यामुळे प्रवाशी व पर्यटक कमालीचे त्रस्त झाले आहे.
जिल्ह्यातीलच नव्हे तर संंपर्र्ण विदर्भातून पर्यटक व्याघ्र प्रकल्पात वाघ व इतर प्राणी डोळ्यात टिपावे म्हणून हौसेने येतात. बसने येणाऱ्या प्रवाशांची संख्याही बरीच आहे. बसच्या प्रतिक्षेत ताटकळत असलेले प्रवाशी निवाऱ्याअभावी पानटपऱ्या व झाडांचा आश्रय शोधतात.
सुमारे चार वर्षापासून या निवाऱ्याची दैना झाली आहे. छत, भिंती पडुन खंडार झाले. गवताची झुडपे वाढली आहे. मात्र कुणीही याकडे लक्ष देत नाही. नुकताच बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने येथील महत्व वाढले आहे. एस.टी. महामंडळाने व स्थानिक लोकप्रतिनिधीने प्रवाशी निवारा नव्याने बांधण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परिसरातील प्रवासी या निवाऱ्याचा प्रवासासाठी आधार घेतात. परंतु निवाराच दिसत नसल्याने अनेकदा बसही थांबत नाही. पावसाळ्यात तर कुठे थांबावे असा प्रश्न प्रवाशांना पडतो. महिला प्रवाशांना जास्तीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथे प्रवासी निवारा नव्याने बांधण्यात यावा आणि होत असलेला त्रास थांबवावा अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)
महिलांची कुचंबना, पावसाळ्यात आडोसा शोधताना धावाधाव
या मार्गावरून सेलूकडे व इतरही गावाकडे नागरिक जातात. अनेक महिला रोजगारासाठी अभयारण्याकडे जात असतात. अशावेळी बसची वाट पाहात त्या या निवाऱ्याजवळ थांबतात.
पावसाळ्यात पावसापासून रक्षणासाठी नागरिकांना आजुबाजूच्या झाडांचा किंवा टपरीचा आधार घ्यावा लागतो. पुरुषांना तितकासा त्रास अशावेळी होत नाही. परंतु महिलांची मात्र कुचंबना होते.
नुकताच बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने येथील महत्व वाढले आहे. एस.टी. महामंडळाने व स्थानिक लोकप्रतिनिधीने प्रवासी निवारा नव्याने बांधण्यासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे. उन्हाच्या झळा सोसत नागरिकांना स्थानकासमोर उभे राहावे लागते. पाणी पिण्याचीही येथे कुठलीही सोय नसल्याने ये जा करणारे प्रवासी सतत संताप व्यक्त करीत असतात.
सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका
निवारा परिसराला झुडपांचा वेढा आहे. या कारणाने या पत्रिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर आहे. या भीतीपोटी नागरिक निवाऱ्यापासून जरा दूरच उभे राहतात. त्यामुळे या निवाऱ्याचा उपयोग काय असा प्रश्न पडतो.