प्रवाशाचे पैसे हिसकाविणारा आॅटोचालक जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:31 PM2019-02-22T23:31:42+5:302019-02-22T23:32:53+5:30
देवळी तालुक्यातील मुरदगाव येथील सचिन लक्ष्मण राऊत हा इतवारा येथील पारधी बेड्यावर आला असता एका आॅटोचालकाने बस स्थानकाकडे जायचे आहे काय असे म्हणत सचिनला आॅटोत बसवून घेतले. याच दरम्यान सदर आॅटो चालकाने सचिनजवळील पाकिट आणि मोबाईल हिसकावून पळ काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देवळी तालुक्यातील मुरदगाव येथील सचिन लक्ष्मण राऊत हा इतवारा येथील पारधी बेड्यावर आला असता एका आॅटोचालकाने बस स्थानकाकडे जायचे आहे काय असे म्हणत सचिनला आॅटोत बसवून घेतले. याच दरम्यान सदर आॅटो चालकाने सचिनजवळील पाकिट आणि मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी आपल्या हालचालिंना गती देत अवघ्या काही तासात चोरट्यास हुडकून काढत बेड्या ठोकल्या आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आबीद खाँ अकबर खाँ पठाण (२०) रा. पुलफैल, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सचिन राऊत हा १९ रोजी दुपारी ईतवारा मार्गाने पारधी बेड्याजवळ आला होता. याच वेळी एक अनोळखी आॅटो चालकाने त्याला बस स्टॅन्ड येथे जायचे आहे काय असे विचारून त्याला आॅटोत बसवून घेतले. त्यानंतर आरोपी आॅटोचालकाने परिसरात कुणी नसल्याची संधी साधून सचिन जवळील पाकिट व पाकिटातील रोख ४३० रुपये तसेच एक मोबाईल आणि घड्याळ असा एकूण १ हजार ९३० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला गती दिली. शिवाय आॅटोचालक आबीद खाँ अकबर खाँ पठाण याला सेवाग्राम रेल्वे स्थानक येथून अवघ्या काही तासातच ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवून विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला आॅटो जप्त करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, ठाणेदार अशोक चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक, पपीन रामटेके, सतीश वैरागडे, सचिन दवाळे, मंगेश झामरे, आकाश कांबळे, रामेश्वर नागरे, किशोर साटोण, निखी वासेकर यांनी केली. या चोरट्यापासून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.