प्रवासी, विद्यार्थ्यांना बसखाली उतरवित फेरी केली रद्द
By admin | Published: November 9, 2016 01:03 AM2016-11-09T01:03:26+5:302016-11-09T01:03:26+5:30
वर्धा ते माळेगाव (ठेका) ही बस फलाटावर लावण्यात आली. प्रवासी व विद्यार्थी बसमध्ये बसले;
वाहकाचा प्रताप : एसटी रद्द झाल्याने सायंकाळपर्यंत ताटकळ
आकोली : वर्धा ते माळेगाव (ठेका) ही बस फलाटावर लावण्यात आली. प्रवासी व विद्यार्थी बसमध्ये बसले; पण कमी प्रवासी असल्याचे कारण समोर करून दीड वाजताची ही बसफेरी रद्द करण्यात आली. वाहक व परिवहन महामंडळाने केलेल्या या प्रतापामुळे प्रवाशांना तब्बल ४.३० वाजेपर्यंत वर्धा बसस्थानक व सुकळी (बाई) फाट्यावर ताटकळावे लागले.
वर्धा ते माळेगाव (ठेका) या आडवळणाच्या मार्गावर खासगी वाहतुकीची पुरेशी सोय नाही. आॅटो, मिनीडोअर केवळ आकोलीपर्यंत आहेत. पूढे बसशिवाय अन्य पर्याय नाही. यामुळे प्रवाशांना बसवर अवलंबून राहावे लागते. नेहमीप्रमाणे या मार्गावर प्रवास करणारे व विद्यार्थी बसच्या वेळेवर बसस्थानकात पोहोचले. दीड वाजताची बसफेरी फलाटावर लावण्यात आली. यामुळे प्रवाशांना हायसे वाटले. १५ महिला व पुरुष प्रवासी बसमध्ये स्थानापन्न झाले. यानंतर वाहकाचे आगमन झाले. प्रवासी तिकीट काढायला गेले असता त्यांना बसखाली उतरण्याचे फर्माण वाहकाने सोडले. बसखाली उतरविण्याचे कारण विचारले असता १५ प्रवाशांसाठी बस सोडायला परवडत नाही. बसफेरी रद्द करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले. या प्रकारामुळे हिरमोड झालेल्या प्रवाशांनी आगार प्रमुखाची भेट घेत घडलेली हकीकत सांगितली; पण आगार प्रमुखांनीही वाहकाची री ओढली. यामुळे प्रवासी दुसऱ्या बसने सुकळी (बाई) फाट्यापर्यंत आले; पण माळेगाव (ठेका) कडे जाणारे आॅटो वा मिनीडोअर कमी असल्याने प्रवाशांना ४.३० पर्यंत फाट्यावर जांभळ्या ताटकळावे लागले.(वार्ताहर)