निवडणूक कार्यक्रम कामचुकार कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर
By admin | Published: October 9, 2014 11:06 PM2014-10-09T23:06:29+5:302014-10-09T23:06:29+5:30
विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. यात अनेक कामे असतात. या कामाकरिता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. ही नियुक्ती करताना कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना त्रास होणार नाही
वर्धा : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. यात अनेक कामे असतात. या कामाकरिता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. ही नियुक्ती करताना कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना त्रास होणार नाही याकरिता काही कर्मचारी कार्यालयात असतात. वर्धेत मात्र शासकीय कार्यालयात सारेच कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. साऱ्याच विभागात शुकशुकाट आहे. निवडणुकीच्या कामात जरी नियुक्ती झाली नसली तरी काही कामचोर कर्मचारी या कारणाने कार्यालयातून बेपत्ता होत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा प्रशासनाच्या कोणत्याही कार्यालयात सकाळी ११ वाजताच्या सुमारास गेल्यास अर्ध्या बाकांवर कर्मचारी दिसतील तर अर्धे बाक रिकामे दिसतील. यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास कार्यालयात जा सारेच बाक रिकामे दिसतील. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्याच्या तोंडून एकच उत्तर मिळते निवडणुकीच्या कामात आहे. जिल्ह्यातील सारेच कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असतील तर नागरिकांनी त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता नेमके कुठे जावे असा नवा प्रश्न समोर येत आहे. आचारसंहिता असल्याने शासकीय कामे अडकली आहेत; मात्र समस्या सोडविण्यात तर आचारसंहितेची आडकाठी येत नसावी, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.
जिल्हा प्रशासनातील पाच हजार ५६४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे, यात दुमत नाही. या कामात महसूल विभागाच्या व शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा भरणा अधिक आहे. इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची सख्या तशी कमीच आहे. असे असतानाही जिल्ह्यातील कृषी विभाग, आरोग्य विभागासारख्या कार्यालयात काही कामाकरिता गेले असता नागरिकांना साहेब निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे उत्तर मिळत आहे. कार्यालयात कर्मचारी नसल्याने या काळात विविध कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
येत्या दिवसात सणांना सुरुवात होत अससल्याने गावातील नागरिक विविध शासकीय कामांकरिता वर्धेत येत आहेत. यामुळे गाव खेड्यातून विविध कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. (प्रतिनिधी)