नागपुरात मृत घोषित रुग्ण गावात जीवंत; नातेवाईकांनी गाठले रुग्णालय
By आनंद इंगोले | Published: February 22, 2023 09:01 PM2023-02-22T21:01:44+5:302023-02-22T21:01:49+5:30
पालोरा येथील घटना : कारंजातील डॉक्टरांनीही ठरविले मृत
कारंजा (घाडगे)(वर्धा) : तालुक्यातील पालोरा येथील रुग्णाची प्रकृती खालावल्याने कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी नागपुरला हलविण्यास सांगितल्याने रुग्णाला नागपुरच्या रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर घरी आणून अंत्यसंस्काराच्यावेळी नातेवाईकांना मृताच्या डोळ्याची उघडझाप झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा कारंजातील रुग्णालय गाठले. येथील डॉक्टरांनीही पुन्हा मृत घोषित केल्याने या प्रकारावर पडदा पडला.
दिलीप रामोजी ढोले (३४) रा. पालोरा असे मृताचे नाव आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त््यांना २१ फेब्रवारीला रात्री २ वाजतादरम्यान कारंजा येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करुन रुग्णाला नागपुरला हलविण्यास सांगितले. यावरुन नातेवाईकांनी रुग्णाला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
त्यानंतर दिलीप यांचा मृतदेह पालोरा या गावी परत आणला. आज त्यांच्या अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी करुन आंघोळ घालत असताना त्यांनी डोळ्याची उघडझाप केल्याचे आणि अंग गरम असल्याचे बहिण संगिता यांच्या लक्षात आले. त्यामुळे आपला भाऊ जीवंत आहे, असे समजून सायंकाळी साडेसहा वाजतादरम्यान पुन्हा कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. येथील डॉ. स्मिता करणाके यांनीही मृत घोषित केले.
दिलीप ढोले यांच्या नातेवाईकांना ते जीवंत असल्याचा भास होऊ शकतो. यातूनच हा प्रकार घडला असावा. अन्यथा असा प्रकार घडू शकत नाही. मृत व्यक्तीला पुन्हा रुग्णालयात आणले असता त्यांचा इसीजी पल्स किंवा इतर शारीरिक कोणत्याही हालचाली सक्रीय नव्हत्या.
डॉ. स्मिता करणाके, ग्रामीण रुग्णालय, कारंजा (घा.)