coronavirus; ओडिशाचा एक रुग्ण वर्ध्याच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 12:00 PM2020-06-12T12:00:19+5:302020-06-12T12:00:41+5:30
ओडिशातील एक रुग्ण वर्ध्याच्या यादीत कायम असल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या शासनाच्या लेखी १४ आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात वर्ध्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर बाहेर जिल्ह्यातील व्यक्तींनी रुग्णसंख्या २५ च्या घरात पोहोचविली. प्रत्यक्षात जिल्ह्यातील रुग्णसंख्या १३ असून बाहेर जिल्ह्यातील रुग्ण वर्ध्यात आल्याने आकडा एकदम वाढला. तो कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने शासनदरबारी प्रयत्न केल्यानंतरही ओडिशातील एक रुग्ण वर्ध्याच्या यादीत कायम असल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या शासनाच्या लेखी १४ आहे.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे तिसऱ्या लॉकडाऊनच्या अखेरपर्यंत जिल्हा ग्रीन झोनमध्ये राहिला. मात्र, एका मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या हळूहळू वाढतच गेली. लॉकडाऊन काळात पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यात राहणारे वर्ध्यात दाखल झाले. तसेच काही इतर जिल्ह्यातील रुग्ण वर्ध्यातील सेवाग्राम व सावंगी रुग्णालयात उपचाराकरिता आल्यानंतर त्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे वर्ध्यातील कोरोनाबाधितांचा आकडा एकदम २५ वर पोहोचला. या रुग्णांमध्ये वर्धा जिल्ह्यासह अमरावती, अकोला, वाशिम, उत्तरप्रदेश, ओडिशा, गोरखपूर येथील रुग्णांचा समावेश आहे. बाहेर जिल्ह्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आपापल्या गावी सोडण्यात आले. बाहेर जिल्ह्यातील रुग्णांना वर्धा जिल्ह्याच्या यादीतून वगळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी करण्यात आली. तरीही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीमध्ये ओडिशा येथील एक रुग्ण वर्धा जिल्ह्याच्या यादीमध्ये कायम असल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या १४ दाखविली जात आहे. जिल्ह्यातील १३ रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून ७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सहा जणांवर उपचार सुरू आहेत. यातील चौघे वर्ध्यात, एक नागपूर आणि एक सिकंदराबादमध्ये दाखल आहे. त्यामुळे ओडिशातील एक रुग्ण वर्धा जिल्ह्याच्या यादीतून वगळण्याची गरज व्यक्त होत आहे.
वर्धा जिल्ह्यामध्ये सध्या १३ रुग्ण असून ओडिशा येथील एक रुग्ण चुकून महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर वर्धा जिल्ह्यामध्ये दाखविला जात आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील रुग्णसंख्या १४ दिसत आहे. यासाठी पत्रव्यवहार सुरू असून लवकरच तो रुग्ण पोर्टलवरून कमी होईल.
डॉ.अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.