डॉक्टरांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक

By admin | Published: June 23, 2014 12:15 AM2014-06-23T00:15:57+5:302014-06-23T00:15:57+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयात नोकरीवर असणारे डॉक्टर मोठ्या वेतनावर असताना खासगी दवाखाने सुरू करतात़ यामुळे ज्या रुग्णालयात नोकरी करतात तेथे कर्तव्यात कसूर करून तेथील रुग्णांना स्वत:च्या

Patients' financial exploitation by doctors | डॉक्टरांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक

डॉक्टरांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक

Next

वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयात नोकरीवर असणारे डॉक्टर मोठ्या वेतनावर असताना खासगी दवाखाने सुरू करतात़ यामुळे ज्या रुग्णालयात नोकरी करतात तेथे कर्तव्यात कसूर करून तेथील रुग्णांना स्वत:च्या खासगी दवाखान्यात येण्यास बाध्य करतात़ हा प्रकार जिल्ह्यासह वर्धेत सर्रास सुरू आहे़ जिल्हा शल्य चिकित्सकांनी याकडे लक्ष देत अशा डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी सुरेश पट्टेवार यांनी केली आहे़
शासकीय नोकरीवर असल्याने खासगी दवाखाना थाटण्यास मनाई करणे गरजेचे आहे़ नोकरी किंवा खासगी क्लिनिक, असा नियम करणे आवश्यक आहे; पण दोन्ही ठिकाणी सेवा दिली जात असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे़ आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास रुग्णांना सहन करावा लागतो़ शिवाय त्यांची पिळवणूक होत आहे़ खासगी दवाखाने सुरू केल्याने ज्या ठिकाणी डॉक्टर नोकरी करतात, तेथे योग्य सेवा देत नाहीत़ पळ काढण्याच्या तयारीत असतात व स्वत:च्या दवाखान्यातील रुग्णसंख्या कशी वाढेल, याचाच विचार ते करतात. नोकरी करून केवळ वेतन घेतात; पण रुग्णांना योग्य सेवा देत नाहीत़ यामुळे शासनाने जे डॉक्टर नोकरी करतात, त्यांना खासगी दवाखाने लावता येणार नाही, असा नियम करणेच गरजेचे आहे़ आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांकडूनच सध्या रुग्णांची लूट होत असल्याचे दिसून येत आहे़
सामान्य रुग्णालयातून आऊट प्रिस्कीप्शनमधून रुग्णांना पूर्णत: औषध मिळत नाही. यामुळे सामान्य रुग्णांना बाहेरूनच औषधी खरेदी करावी लागते़ खासगी डॉक्टर रुग्णांची लूट करीत आहेत़ अवाढव्य शुल्क आकारले जात असून रुग्णांना महागडे औषध लिहून दिले जाते़ रुग्णसेवा लक्षात घेता ३० रुपयांच्यावर कोणत्याही डॉक्टरने रुग्णांकडून शुल्क आकारू नये़ डॉक्टर एबीबीएस असो वा एमएस, एमडी असो, रुग्णसेवा करण्याचा दृष्टीकोन ठेवूनच खासगी दवाखाने सुरू करून रुग्णांकडून अल्प शुल्क घेतले पाहिजे; पण असे होत नाही़ गत काही वर्षांत खासगी डॉक्टरच्या शुल्कात अवाढव्य वाढ झाली आहे़ महागडी औषधी रुग्णांचे कंबरडे मोडत आहे़ काही कारण नसताना डॉक्टर रुग्णांना विविध तपासण्या करण्यास बाध्य करतात़ यातही डॉक्टरांचे कमिशन असते. यावरून डॉक्टर रुग्णसेवा करतात की, लूट असा प्रश्न उपस्थित होत आहे़ प्रत्येक डॉक्टरने आपल्या दवाखान्याची वेळ निश्चित करणे गरजेचे आहे़ शिवाय दर्शनी भागात शुल्काचा फलक लावणे व स्वस्त औषधी लिहुन देणे गरजेचे झाले आहे़
खासगी डॉक्टरांनी रुग्णांकडून २० ते ३० रुपये शुल्क आकारावे, स्वस्त औषधी लिहून द्यावी, डॉक्टरांनी दवाखान्यात बसण्याची वेळ निश्चित करावी, अवास्तव तपासण्या करण्यास बाध्य करू नये, स्वत:चे कमिशन बंद करावे, केवळ सेवा हेच ध्येय डॉक्टरांनी ठेवावे, अशी विनंतीवजा मागणीही सुरेश पट्टेवार यांनी केली आहे़ डॉक्टर हे सर्वसामान्य लोकांना आरोग्य प्रदान करून निरोगी करणारे असणे अपेक्षित असते; पण त्वरित श्रीमंत होण्याकरिता अवैध मार्ग पत्करुन कशाचीही पर्वा न करता केवळ पैशाच्या मागे लागणारे अनेक डॉक्टर समाजात दिसतात़ यातून रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात असल्याचे दिसते़ हा प्रकार थांबविणे गरजेचे झाले आहे़ रुग्णांना वाचविण्यापेक्षा कसे लुटता येईल, याचा प्रयत्न करणारे डॉक्टर शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करणेही गरजेचे झाले आहे़ मेडिकल कौन्सिलने व शल्य चिकित्सकांनी याकडे लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Patients' financial exploitation by doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.