कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांची हेळसांड
By admin | Published: October 11, 2015 12:26 AM2015-10-11T00:26:48+5:302015-10-11T00:26:48+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळच्यावेळी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.
आरोग्य सेवा कोलमडली : नंदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार
नंदोरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळच्यावेळी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. अधिकारी नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना अर्थिक झळ सोसावी लागत आहे.
येथील रेखा रोहणकर यांच्या डोक्याला इजा झाल्याने त्या सायंकाळी नंदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या. त्यांच्या डोक्याला टिनपत्र्याने कापल्याची इजा झाली होती. यावेळी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. शिपाई व आरोग्य सेविकास जी.एस. टिपले यांनी सध्या एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने मी काहीही करून शकत नसल्याचे सांगितले. रुग्णाला खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. या रुग्णाला रुग्णालयात नेले असता तिला चार टाके पडले.
या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता येथील डॉ. कांबळे हे प्रशिक्षणाला गेले तर डॉ. स्रेहा पाटील या किरकोळ रजेवर होत्या. त्यांचा प्रभार निंभा उपकेंद्राच्या अधिकारी डॉ. योगिता देशभ्रतार यांना देण्यात आला. दुसरा कोणताही वैद्यकीय अधिकारी नसतानाही त्या प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडून गेल्याचे समोर आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्य केंद्रात कर्मचारी उशिरा येत असतात. शासनाकडून मिळणारा घरभाडे भत्ता उचल करून शासनाची दिशाभूल येथील कर्मचारी करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. रात्रीला प्राथमिक आरोग्य केंद्रातील आकस्मिक सेवा विस्कटल्याने त्यांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रावण रोहणकर, सतीश पिठाडे, सचिन हिवरकर, दिनकर रोहणकर आदिंनी केली आहे. वरिष्ठ याची दखल घेतील काय, याकडे लक्ष लागले आहेत.(वार्ताहर)