शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; १,२९३ जागांसाठी लवकरच होणार पदभरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 02:06 PM2022-05-20T14:06:35+5:302022-05-20T14:08:16+5:30
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यात पुण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे.
वर्धा : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक शाळांमधील वाढीव प्राध्यापक पदांच्या भरतीचा अनेक दिवसांपासून रेंगाळलेला प्रश्न आता मार्गी लागला आहे. या शिक्षकांच्या १ हजार २९३ पदांसाठी लवकरच भरती केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यात पुण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे. बैठकीदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील १ हजार २९३ वाढीव पदांपैकी १ हजार २८ पदांची माहिती मंत्रालयात सादर करण्यात आली आहे. उर्वरित २६५ पदांची माहिती येत्या दिवसात मंत्रालयात सादर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील महाविद्यालयांमधील सुमारे ६० टक्क्यांहून अधिक कायमस्वरूपी प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. प्राध्यापक भरती रखडल्याने महाविद्यालयीन शिक्षणाची परिस्थिती गंभीर झाली आहे. पाच वर्षांपूर्वी निवृत्त होणाऱ्या प्राध्यापकांची संख्या लक्षात घेऊन २०१७ मध्येच शिक्षक भरतीची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, कोरोनामुळे ही पदभरती लांबली. त्यानंतर नोव्हेंबर २०२१मध्ये पदभरतीवरील निर्बंध शिथिल होताच, संवर्गनिहाय आरक्षणाचा मसुदा विधिमंडळात मांडण्यात आला. दोन्ही सभागृहांत त्यास मंजुरी मिळून विधेयकावर राज्यपालांची जानेवारीतच स्वाक्षरी झाली. त्यानंतरही ही भरती लांबली होती. मात्र, आता भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शिक्षण संचालकांनी या बैठकीत सांगितले. यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.