फुटपाथ, अतिक्रमण, झोपडपट्टीधारकांना पट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:10 AM2017-11-30T00:10:05+5:302017-11-30T00:10:49+5:30
दोन दिवस अतिक्रमण काढले. यात रोजगार हिरावल्याने अनेक जण बेरोजगार झाले. यामुळे न.प. व महसूल विभागाने झोपडपट्टी, फुटपाथ, अतिक्रमण धारकांचा सर्व्हे करून पुस्तिका तयार करावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : दोन दिवस अतिक्रमण काढले. यात रोजगार हिरावल्याने अनेक जण बेरोजगार झाले. यामुळे न.प. व महसूल विभागाने झोपडपट्टी, फुटपाथ, अतिक्रमण धारकांचा सर्व्हे करून पुस्तिका तयार करावी. पालिका, महसुलाच्या हद्दीतील जागा देत पट्टे वाटप करावे या मागणीसाठी माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात बुधवारी मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी, शेतमजूर, कामगार, गोरगरीब लोकांची वस्ती आहे. गरीब जनता पोट भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला भाजीपाला, फळे, कपडे, पानठेले, शिलाई, चप्पल, शीतपेय, लाऊडस्पीकर, बांगड्या, केशकर्तन, भांडे, क्रॉकरी, पान आदी दुकाने सुरू करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. २३ नोव्हेंबरपासून शहरात अतिक्रमण काढले जात आहे. यामुळे रोजगार बंद झाल्याने गरीब नागरिक हताश झाले. त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले. त्यांना नगर परिषद, महसूल विभागाने पट्टे द्यावे. १ नोव्हेंबर १९९५ च्या मतदार यादीत नावे असलेल्या पात्र झोपडपट्टी वासीयांना भोगवटीखालील जमिनी भाडे तत्वावर वा पर्यायी भूखंड देत पुनर्वसनासाठी शासनाने परिपत्रके काढली; पण अद्याप झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटप केले नाही. यामुळे त्वरित पट्टे वाटप करावे, अशी मागणी केली. मोर्चात प्रा. राजू तिमांडे, माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, अनिल भोंगाडे, सौरभ तिमांडे, सुनील मोहता, अशोक आंबटकर, बकाणे, तामगाडगे, मिर्झा जावेद बेग, मिर्झा दौलतबेग, लांडगे, अ. आरिफ अ. सुभान कुरेशी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.