रेतीच्या वाहतुकीने महामार्गावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:06 AM2018-01-02T00:06:48+5:302018-01-02T00:07:01+5:30
रेती वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे कोल्ही ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंतचा रस्ता उखडला आहे. या मार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे.
आॅनलाईन लोकमत
समुद्रपूर : रेती वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे कोल्ही ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंतचा रस्ता उखडला आहे. या मार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. दिवसाला या रस्त्याने रेतीची वाहतूक करणारे शेकडो वाहने धावतात. रस्त्याची क्षमता तुलनेने कमी असल्याने रस्त्याची दैनावस्था झाली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
या मार्गाने रेतीची वाहतूक करणारे वाहने भरधाव जातात. त्यामुळे अन्य वाहन धारकांना अपघाताचा धोका असतो. महामार्गाने ही वाहतूक होत असताना याकडे संबधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बैलबंडी, दुचाकी असे वाहन या रस्त्याने घेऊन जाताना चालकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. रस्त्याच्या डागडुजीची मागणी होत आहे.
अपघाताचा धोका
रस्ता अरूंद असल्याने जड वाहतुकीने समस्येत अधिकच भर पडत आहे. कधीतर पादचाऱ्यांना आवागमन करायला जागा नसते. ही बाब अपघाताला निमंत्रण देत आहे. या मार्गाने रेतीची अवैध वाहतूक वाढली आहे. याकडे लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी सय्यद शफात अहमद व ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.
खड्ड्यांची स्थिती जैसै थे’
सेवाग्राम - हमदापूर ते सेवाग्राम मार्गावरील खड्ड्यांच्या डागडुजीचे काम सुरू आहे. मात्र यात डांबराचा वापर अत्यल्प होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करतात. रस्त्यावरील गिट्टी आताच उखडली आहे. त्यामुळे दुरूस्त केलेले खड्डे जैसे थे असल्याचे दिसते. या प्रकाराने वाहन चालक व प्रवासी संताप व्यक्त करतात. सेवाग्राम-हमदापूर हा मार्ग वर्दळीचा आहे. मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होते. याच मार्गावर पुढे रेतीघाट आहे. त्यामुळे रेतीची वाहतूक नित्य होत असते. परिणामी रस्ता खड्डेमय झाला आहे. मात्र डागडुजी करताना निकृष्ट काम होत असल्याचा प्रकार येथे घडत आहे.
वाहन चालक व प्रवाशांना या रस्त्याने जाताना अडचणीचा सामना करावा लागतो. वाहनांच्या दुरूस्तीचा खर्च वाढला आहे. आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. खड्डेमय रस्त्याने प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. या मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम करताना डांबर केवळ शिंपडले जात आहे. गिट्टी भरून प्रेसिंग केली तरी ती अल्पावधीत बाहेर पडत आहे. अंबानगर परिसरातील गिट्टी उखडत आहे. गिट्टी व चुरीमुळे वाहन घसरून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे.