सेवाग्राम विकास आराखड्यातून पवनारचे ग्रामपंचायत भवन वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 05:00 AM2021-12-09T05:00:00+5:302021-12-09T05:00:07+5:30
सेवाग्राम - पवनार विकास आराखड्यांतर्गत पवनार येथील धाम नदी व ब्रह्म विद्या मंदिर परिसराचे साबरमती तीराप्रमाणे सौंदर्यीकरण करण्यासाठी ४४ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली. नंदीखेडा परिसरातील कामे जवळपास ९० टक्के पूर्ण झाली. परंतु, आश्रमाच्या बाजुला फक्त प्रवेशद्वार व माती काम करण्यात आले. नदीतील बराच भाग मुरूम टाकून बुजवल्यामुळे त्या कामाला राजेंद्र सिंह व ब्रह्म विद्या मंदिर प्रशासनाकडून विरोध दर्शविण्यात आला.
श्रीकांत तोटे
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत पवनार गावाच्या विकासासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर मोठा गाजावाजा करण्यात आला. सद्यस्थितीत हे काम ९० टक्के पूर्ण झाले असले तरी या कामातून चक्क पवनारचे ग्रामपंचायत भवन वगळण्यात आल्याने ग्रामस्थांचा हिरमोड झाला आहे.
सेवाग्राम - पवनार विकास आराखड्यांतर्गत पवनार येथील धाम नदी व ब्रह्म विद्या मंदिर परिसराचे साबरमती तीराप्रमाणे सौंदर्यीकरण करण्यासाठी ४४ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली. नंदीखेडा परिसरातील कामे जवळपास ९० टक्के पूर्ण झाली. परंतु, आश्रमाच्या बाजुला फक्त प्रवेशद्वार व माती काम करण्यात आले. नदीतील बराच भाग मुरूम टाकून बुजवल्यामुळे त्या कामाला राजेंद्र सिंह व ब्रह्म विद्या मंदिर प्रशासनाकडून विरोध दर्शविण्यात आला. सर्वांची मनधरणी झाल्यानंतर पुन्हा काम सुरू होणार होते. त्यासाठी परिसरातील अतिक्रमणही काढण्यात आले. या प्रक्रियेला वर्ष लोटले तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. इतकेच नव्हे तर या विकास आराखड्यात पवनार गावातील अंतर्गत सुविधा व ग्रामपंचायत भवनही समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, निविदा काढल्यानंतर ग्रामपंचायत भवन रद्द झाल्याने पवनार येथील ग्रामस्थांचा हिरमोड झाला आहे.
कठडे गेले चोरीला
- धाम तीरावरील पायऱ्यांवर बसविण्यात आलेले कठडे सध्या बेपत्ता असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त न केल्याने हे कठडे चोरीला गेल्याची चर्चा परिसरात होत आहे.
फुलझाडे करपली
- पवनारच्या धाम तीराचे रुपडे बदलावे म्हणून या ठिकाणी काही परिसरात फुलझाडे लावण्यात आली. पण रोपट्यांना वेळोवेळी पाणी देण्यासाठी असलेली मोटार बिघडल्याने व ती वेळीच दुरूस्त न केल्याने सध्या अनेक फुलझाडे करपली आहेत.
ग्रामपंचायतसमोर अनेक प्रश्न
- काम पूर्ण न झाल्याने ग्रामपंचायतीने ते आपल्या ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. शिवाय त्याच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च कसा करायचा, हा प्रश्न सध्या ग्रामपंचायत प्रशासनासमोर आहे. हे विकासकाम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ किंवा वन विभागाच्या ताब्यात घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मनधरणी सुरू आहे, असे असले तरी तोवर झालेले हे विकासकाम शाबूत राहावे हे तितकेच खरे.
पवनार येथील विकासकाम अजूनही पूर्ण व्हायचे आहे. त्यामुळे ग्रा. पं. प्रशासनाने ताबा घेण्यास नकार दिला आहे. पवनार येथे झालेल्या विकासकामाची देखभाल दुरूस्ती कशी करावी, हा प्रश्न ग्रा. पं. प्रशासनासमोर आहे.
- शालिनी आदमने, सरपंच, पवनार.