पाणी घ्या २०० रूपये ड्रम; वर्धा जिल्ह्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:06 AM2019-05-09T11:06:30+5:302019-05-09T11:08:18+5:30

उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढत आहे तसतशी पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू आहे.

Pay 200 Rupees for water Drum; Status in Wardha District | पाणी घ्या २०० रूपये ड्रम; वर्धा जिल्ह्यातील स्थिती

पाणी घ्या २०० रूपये ड्रम; वर्धा जिल्ह्यातील स्थिती

Next
ठळक मुद्देथार येथील पाणीटंचाई एकाच विहिरीवरुन गावाला होतोय पाणीपुरवठा

अमोल सोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढत आहे तसतशी पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू आहे. थार गावात पाणीपुरवठ्यासाठी १२ बैलबंड्या तयार करण्यात आल्या असुन २०० रुपये प्रति ड्रमने पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे. पण, प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
डोंगरमाथ्यावर असलेल्या थार गावाचा डार्क झोनमध्ये समावेश आहे. याठिकाणी हरियाली, एकात्मीक पाणलोट व्यवस्थापन, जलयुक्त शिवार अभियान, जिल्हा वार्षीक योजना, सामाजिक वाणीकरण यासारख्या विविध योजनेमधून कामे करण्यात आली. मात्र जमिनीची रचना कडक स्वरूपाची असल्याने खडकाळ व दगडी भागाचा पट्टा कायम आहे. पावसाळ्यात होणारे जलव्यवस्थापन येथे शंभर टक्के असफल झाले आहे. जानेवारी महिण्यापासून भूगर्भातील पाण्याचा भाग खोलवर गेला आहे. नैसर्गीक स्त्रोत संपल्यामुळे येथे कृत्रिम पाणी व्यवस्थापनावर भर दिल्या जाते. येथे शासनाच्या कुठल्याही योजनेची प्रबळ अंमलबजावनी करण्यात आली नाही. परिणामी आज पिण्याचे पाणी, वापराचे पाणी, जनावरांचे पाणी कुठेही दिसत नाही. गावाच्या वेशीवर एकमेव सार्वजनिक विहीर आहे. यामध्ये थोडाफार साठा दिवसाला संचयित होतो. त्यामधून गावातील नागरिक आपली तहान भागवत होते. तीही विहीर कोरडी झाल्याने गावकरी दुरवरुन पाणी आणतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीफार ठीक आहे. असे नागरिक २०० रुपये प्रति ड्रम या दराने पाणी विकत घेऊन घरातील कामधंदा आणि तृष्णातृप्ती करुन आपली निकड भागवित आहे.
गावात इतकी भीषण पाणीटंचाई असताना ग्रामपंचायतने टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यासंदर्भात अद्याप प्रस्तावच पाठविला नसल्याची धक्कादायक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
ग्रामपंचायतकडून टँकरबाबत काहीही पाठपुरावा केला नसल्याने गावात ही पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. पाण्याअभावी गावातील दोन हजारावर जनावरांनी दुसरीकडे स्थलांतर केले आहे. या परिसरात दही, ताक, तुप व दुध या स्रिग्ध पदार्थाचे भरपूर उत्पादन घेतले जाते. यावर्षी पाणी आणि चारा टंचाई निर्माण झाल्याने जनावरांना जगविण्याची मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गोपालकांनी गाव सोडले आहे. आता नागरिकांनाही पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाल्याने गाव सोडण्याची वेळ आली आहे. सामान्य परिवार पाणी विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे थार या गावातील पाण्याची भीषणता लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

ग्रामपंचायतचे विकासकामात लक्ष नाही. केवळ राजकारण करून ग्रामस्थांना वेठीस धरून सामान्य नागरिकांना पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर खस्ता खाव्या लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा न केल्यास गावकऱ्यांसह आंदोलन करणार.
- राजकुमार निस्वादे, माजी सरपंच, थार

Web Title: Pay 200 Rupees for water Drum; Status in Wardha District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.