सार्वजनिक बांधकामांकडे गावकºयांनी लक्ष द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 10:12 PM2017-10-03T22:12:06+5:302017-10-03T22:12:19+5:30
प्रत्येक गावात शासकीय खर्चाने आमदार वा इतर फंडातून गावविकासाची बांधकामे होत असतात. ही सर्व सार्वजनिक बांधकामे दर्जेदार होण्यासाठी बांधकाम सुरू असताना ग्रामस्थांनी विशेष लक्ष द्यावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : प्रत्येक गावात शासकीय खर्चाने आमदार वा इतर फंडातून गावविकासाची बांधकामे होत असतात. ही सर्व सार्वजनिक बांधकामे दर्जेदार होण्यासाठी बांधकाम सुरू असताना ग्रामस्थांनी विशेष लक्ष द्यावे. बांधकाम जरी शासन करीत असले तरी लागणारा पैसा कर रूपाने भरलेला आपला असतो. बांधकाम दर्जेदार करून घेणे आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी केवळ कंत्राटदारावर अवलंबून राहता येणार नाही, असे मत आ. अमर काळे यांनी व्यक्त केले.
चंदेवाणी येथील ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण तथा सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गावातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी सतत लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा केला पाहिजे. प्रसंगी आग्रह धरला पाहिजे. जो अधिक पाठपुरावा करेल, त्यांच्या समस्या आधी सुटतात, हा निसर्ग नियम आहे, असे ही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कांबळे तर अतिथी म्हणून मंगेश पाचपोर, उपसरपंच अजय इंगळे, उत्तम इंगळे, रामराव मुडे, घोरमाडे, महिला सदस्य शीला भुयार, कल्पना पांढरीपांडे, घोरमाडे आदी उपस्थित होते. यावेळी मंगेश पाचपोर, प्रा. अरुण फाळके यांनीही विचार व्यक्त केले. ज्ञानेश्वर इंगळे व इतर ग्रामस्थांनी गावातील पांदण रस्ता, नदीवरील रपटा, समाज मंदिर आणि स्मशान शेड आदी समस्या लवकर सोडविण्यासाठी आमदारांनी प्रयत्न करावे, असा आग्रह धरला.
कार्यक्रमाचे संचालन निमकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार ग्रामसेवक आडे यांनी मानले. याप्रसंगी ग्रा.पं. चे ज्येष्ठ कर्मचारी (शिपाई) बबनराव इंगळे यांचा आ. अमर काळे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थ, ग्रा.पं. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपक्रमांचे कौतुक
चंदेवाणी गावात ‘एक गाव एक गणपती’, ‘एक गाव, एक देवी’ हा उप्रकम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे गावात एकोपा निर्माण होण्यास मदत होत आहे. या उपक्रमाचे आ. अमर काळे कौतुक केले. या गावाला ५ लाख रुपयांचा विशेष निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी कार्यक्रमात केली. शिवाय ग्रामस्थांच्या अन्य उपक्रमांचेही आमदारांनी कौतुक केले.