ठेवीदारांना निर्धारित व्याजदर द्या
By admin | Published: September 10, 2016 12:37 AM2016-09-10T00:37:29+5:302016-09-10T00:37:29+5:30
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळाल्यानंतर जिल्ह्यातील मुदती ठेवीदारांना ठेवी परत मिळतील, अशी आशा होती.
सहकारी बँकेतील प्रकार : महात्मा फुले समता परिषदेची मागणी
वर्धा : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळाल्यानंतर जिल्ह्यातील मुदती ठेवीदारांना ठेवी परत मिळतील, अशी आशा होती. २०१३ पासून ठेवीदारांना रक्कम देण्यात आली नाही. आता ठेवीदारांना ४ टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे ठेवीदारांत असंतोष असून निर्धारित व्याजदर मिळावे, अशी मागणी म. फुले समता परिषदेने केली. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन देण्यात आले.
ठेवीदारांच्या मुदत ठेवींवर बँकेने निर्धारित व्याजाप्रमाणे व्याज देण्यात यावे. बँक व ठेवीदार याबाबत करार बंधनकारक करण्यात आला, असे समजते. बँकेत असलेल्या ठेवीवरील ८.५ टक्के मिळणारे व्याज कमी करून ४ टक्के देण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब अन्यायकारक आहे. ठेवीदार गप्प बसणार नाही. नेमलेल्या त्रिसदस्य समितीच्या अध्यक्षांनी ठेवीदारांच्या हिताचे निर्णय घ्यावे. जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे ठेवीदारांचे नुकसान होणार आहे. पूर्वीच्या बँक संचालक मंडळाकडे असलेले कर्ज वसूल करून ठेवी परत कराव्या. कर्मचाऱ्यांनी २०१३ पासून वेतन घेतले; पण ठेवीदारांना एकही पैसा मिळाला नाही. वसुलीतून ५ हजार रुपये दरमहा कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबत ठेवीदारांना द्यावे. खातेदार बँकेत गेल्यास शेतकरी कर्ज वसुली देत नाही, असे सांगितले जाते. मग, वेतनासाठी पैसा येतो कुठून. या बाबींचा गांभीर्याने विचार करून निर्धारित व्याजदर द्यावा, अशी मागणी परिषदेने केली. यावेळी जिल्हा संघटक विनय डहाके, भरत चौधरी निळकंठ राऊत, सुधीर पांगुळ, सुनील दुबे, श्याम जगताप, जयवंत भालेराव, मनोज भांडेकर, अनिल बाळसराफ उपस्थित होेते.(कार्यालय प्रतिनिधी)