शिक्षकांना शासनाच्या नियमानुसार वेतन द्या
By admin | Published: July 10, 2017 12:54 AM2017-07-10T00:54:46+5:302017-07-10T00:54:46+5:30
सी.बी.एस.ई. कॉन्व्हेंट मधील शिक्षकांकडून अतिशय अल्प वेतनावर कामे करून घेतली जात आहेत.
अजय भोयर यांची माहिती : शिक्षण उपसंचालकांचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सी.बी.एस.ई. कॉन्व्हेंट मधील शिक्षकांकडून अतिशय अल्प वेतनावर कामे करून घेतली जात आहेत. अशा शिक्षकांच्या बँक खात्यात राज्य शासनाच्या नियमानुसार वेतन जमा करावे, त्यांना रोख स्वरूपात वेतन देऊ नये, असे आदेश नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिल्याची माहिती प्रा. अजय भोयर यांनी दिली आहे.
राज्यातील बरेच सी.बी.एस.ई. व स्टेट च्या कॉन्व्हेंट शाळा राज्य शासनाच्या नियमांना फाटा देतात. त्यामुळे शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत असलेले शोषण लक्षात घेता नागपूर विभागाचे शिक्षक आ. नागो गाणार यांनी या इंग्रजी शाळांना सुद्धा मराठी शाळाप्रमाणे नियमावली असावी व त्याचे पालन होत नसल्यास शाळेची मान्यता काढावी अशी मागणी केली. त्यानुसार शिक्षण उपसंचालक यांनी इंग्रजी शाळांना बारा मुद्द्यांचे पालन करण्याचे आदेश नुकतेच दिले. त्यात नियमानुसार वेतनाशिवाय प्रामुख्याने खासगी प्रकाशनाचे कोणतेही पुस्तक विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी न देता फक्त एन.सी.ई.आर.टी.कडून प्रकाशित झालेले पुस्तके विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अनिवार्य करावे. शाळेतून, वह्या-पुस्तके, शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याबाबत आग्रह करू नये. पालक-शिक्षक संघानी सर्वानुमते निश्चित केलेले शिक्षण शुल्क, मासिक शुल्क आकारण्यात यावे, शुल्क रोख स्वरूपात न स्विकारता धनादेश, धनाकर्ष, आॅनलाईन बँकींग मार्फत स्विकारावे. शाळेत पात्र मुख्याध्यापक व शिक्षकांची नियुक्ती करुन शिक्षणाधिकाऱ्याकडून मान्यता घ्यावी. कोणतीही देणगी पालकाकडून घेवू नये. आर.टी.ई. कायद्यातील तरतुदीनुसार सर्व शाळांनी आर.टी.ई. खाते मान्यता घ्यावी आदि मुद्दयांचे पालन न झाल्यास शाळेची राज्यशासनाची दिलेली मान्यता व राज्यशासनाने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची कार्यवाही करण्याची तंबी सुद्धा शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या आदेशात दिल्याची माहिती अजय भोयर यांनी दिली. या आदेशामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांची पिळवणूक थांबणार आहे.