सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता तातडीने अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 05:00 AM2022-03-03T05:00:00+5:302022-03-03T05:00:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता तातडीने अदा करण्यात यावा यासह एकूण नऊ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता तातडीने अदा करण्यात यावा यासह एकूण नऊ मागण्यांसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेत बुधवारी पालिका कार्यालयासमोर ठिय्या दिला. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे मुख्य संघटक दीपक रोडे यांनी केले.
नगरपरिषदेच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता तत्काळ अदा करण्यात यावा. संपूर्ण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संपूर्ण देयता तत्काळ अदा करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्याची शिल्लक राहिलेली रक्कम तातडीने अदा करण्यात यावी.
१२ आणि २४ वर्ष झाल्यानंतर देण्यात आलेल्या आश्वासित प्रगती योजनेची थकबाकी अदा करण्यात यावी. ज्येष्ठ लिपिकाचे रिक्त पदे तत्काळ पदोन्नतीने भरण्यात यावी. कनिष्ठ लिपिकाचे रिक्त पदे वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात यावी. सफाई कर्मचाऱ्यांचे हजेरी दिवस महिन्याचे एक तारखेला देण्यात यावी ; जेणेकरून कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होईल. सफाई कर्मचाऱ्यांना मागील पाच वर्षांपासून न दिलेला गणवेश आणि गमबुट देण्यात यावा. सफाई कर्मचाऱ्यांना श्रम साफल्य योजनेमधून तातडीने पक्के घर बांधून देण्यात यावी आदी मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. आंदोलनात मोठ्या संख्येने पालिका कर्मचारी सहभागी झाले होते.
कामकाजावर पडला परिणाम
- कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे बुधवारी नगरपालिकामधील विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे बुधवारी पालिकेच्या कामकाजावर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा विपरित परिणाम पडला.