वर्धा जिल्ह्यात शांततेत मतदान, एका गावाचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 11:14 AM2021-01-16T11:14:02+5:302021-01-16T11:14:22+5:30
Wardha News वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीकरिता मतदान प्रक्रिया पार पडली.
३.३० वाजतापर्यंत ६१.१३ टक्के मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीकरिता मतदान प्रक्रिया पार पडली. कोरोनाच्या उपाययोजना राबवून मतदारांना यावर्षी मास्क लावूनच मतदानाचा हक्क बजवावा लागला. वर्धा, सेलू, देवळी या तालुक्यातील प्रत्येकी तीन, आर्वी तालुक्यातील सात, आष्टी तालुक्यातील चार, कारंजा तालुक्यातील ८, हिंगणघाट तालुक्यातील ५ तर समुद्रपूर तालुक्यातील १७ अशा एकूण ५० ग्रामपंचायतीमधील १७३ प्रभागातील ४७२ सदस्यांकरिता एकूण १ हजार २७९ उमेदवार रिंगणात आहे. या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ५७ हजार १०९ महिला तर ६० हजार ८५७ पुरुष असे एकूण १ लाख १७ हजार ९६६ मतदारांकरिता २०६ मतदान केंद्रावरुन मतदान घेण्यात आले. दुपारी ३.३० वाजतापर्यंत ६१.१३ टक्के मतदान पार पडले. शेवटची टक्केवारी उपलब्ध व्हायला विलंब झाला. पण, ही टक्केवारी ७० टक्केपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्याम.पंत) येथे मतदार यादीतील घोळामध्ये नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. तसेच कारंजा तालुक्यातील खैरेवासीयांनी प्रशासनाप्रति रोष व्यक्त करुन मतदानाचा हक्क न बजावता दिवसभर अन्नत्याग केला. पुनर्वसित असलेल्या या गावात वीस वर्षांपासून कोणत्याही सुविधा नसल्याने गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. कारंजा येथील तहसीलदार सचिन कुमावत यांनी नागरिकांना समाजाविण्याचा प्रयत्न केला तरीही नागरिक आपल्या निर्णयावर ठाम राहिले.