व्हीआयपी मार्गावर खड्डेचखड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:40 AM2017-08-26T01:40:45+5:302017-08-26T01:41:06+5:30
शहरातील व्हीआयपी मार्गाची सध्या दैनावस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून ते रात्रीच्या सुमारास सहन दिसत नसल्याने मोठ्या अपघाताची भीती बळावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील व्हीआयपी मार्गाची सध्या दैनावस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून ते रात्रीच्या सुमारास सहन दिसत नसल्याने मोठ्या अपघाताची भीती बळावली आहे. त्याच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी आहे.
सिव्हील लाईन भागातील जिल्हाधिकाºयांच्या बंगल्यापासून वर्धा-नागपूर मार्गावरील गोपुरी चौक पर्यंतच्या रस्त्याला व्हीआयपी मार्ग अशी ओळख आहे. परंतु, सध्या याच मार्गावर ठिकठिकाणी मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. या मार्गाने प्रवास करणाºयांना तारेवरची कसरतच करीत नियोजित ठिकाणी पोहोचावे लागत आहे. सदर मार्गावरील पथदिवे रात्रीच्या सुमारास बंद राहत असल्याने रस्त्यावरील खड्डे वाहनचालकांना सहज दिसत नाही. इतरकेच नव्हे तर रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. खड्डा चुकविण्याच्या नादात अनेक अपघातात झाले असून अनेकांना कायमचे अपंगत्त्व आल्याचे वास्तव आहेत. तर अनेकांना प्राणही गमवावा लागला. या मार्गावरील प्रवास धोक्याचा ठरत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी संभाव्य धोका लक्षात घेता सदर मार्गाच्या दुरूस्तीची काम तात्काळ हाती घेण्याची मागणी आहे.