रस्त्यावर कांदे विक्रेत्यांना नियम डावलून दंड
By admin | Published: May 24, 2017 12:45 AM2017-05-24T00:45:09+5:302017-05-24T00:45:09+5:30
शहरात रस्त्यावर जागा मिळेल तिथे कांदे विकणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत. यात कोण व्यापारी व कोण शेतकरी
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रताप : गवगवा होताच दंडाची रक्कम केली परत
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात रस्त्यावर जागा मिळेल तिथे कांदे विकणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत. यात कोण व्यापारी व कोण शेतकरी हा मुद्दा गौण असला तरी यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याची ओरड झाली. यामुळे बाजार समितीच्या एका कर्मचाऱ्याने कुठलीही चौकशी न करता नियमांना डावलून रस्त्यावर कांदे विकणाऱ्यांना थेट दंड ठोठावला. या प्रकरणाचा गवगवा होताच बाजार समितीच्यावतीने झालेल्या प्रकारावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करीत दंड केलेल्यांना त्यांची रक्कम परत केली.
वर्धा शहरातच नाही तर जिल्ह्यातील इतर भागातही रस्त्यावर गाडी उभी करून कांदे विकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हे विक्रेते शेतकरी आहेत अथवा व्यापारी याची कुठलीही शहानाशी होत नाही. त्यांच्याकडून अत्यल्प दरात कांदा मिळत असल्याने नागरिकांकडून त्याची खरेदी होत आहे. याचा त्रास बाजार समितीतील काही व्यापाऱ्यांना झाल्याने त्यांनी बाजार समितीत जात ओरड केली. यावर कुठलीही चौकशी न करता एका कर्मचाऱ्याने थेट कांदा विक्रीचे ठिकाण गाठत विक्री करणाऱ्यांना दंडा ठोठावला. याची माहिती बाजार समितीच्या सचिवांना कळताच त्यांनी हा प्रकार नियमाला डावलून असल्याचे म्हणताच सदर कर्मचारी बाजार समितीत परत आला.
त्याने दंड ठोठावलेल्या कांदा विक्रेत्यांकडून घेतलेली रक्कम त्यांना परत केली. आतापर्यंत दोन विक्रेते दंडाची रक्कम परत घेवून गेल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली आहे. दंडाची रक्कम परत करण्यात आली असली तरी झालेला प्रकार हा चिंताजनकच असल्याची ओरड होत आहे. याकडे बाजार समितीच्या सभापतींनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
दोघांना केली रक्कम परत
बाजार समितीच्या कर्मचाऱ्याकडून केलेल्या दंडाची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. यानुसार दोघांनी बाजार समितीशी संपर्क साधात दंडाची रक्कम परत घेतली. या दोघांकडे सातबारा आणि पेरीपत्रक असल्याने ते शेतकरी असल्याचे समोर आहे. शेतकऱ्यांकडून त्याचे उत्पादन त्याच्या मर्जीच्या दराने विकल्या जात असल्याने व्यापाऱ्यांत चांगलीच खळबळ माजल्याचे दिसून येत आहे. यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
झालेला प्रकार कानावर आला. प्रारंभी याची कल्पना असती तर वेळीच यावर प्रतिबंध लावण्यात आला असता. मात्र प्रकार घडल्यावर माहिती मिळाल्याने दंड म्हणून वसूल केलेली रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. दंडासंबंधीची माहिती सचिवांना अधिक आहे.
- श्याम कार्लेकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा
नियमानुसार बाजारात कुठेही भाजी विक्री करणाऱ्यांना दंड करण्याचा अधिकार बाजार समितीला नाही. मात्र कर्मचाऱ्यांच्या हातून ही चूक घडली. विक्री करणारा शेतकरी अथवा व्यापारी याचा निर्णय उपनिबंधक कार्यालय ठरवेल. येथे घडलेल्या चुकीअंती केलेला दंड परत देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत दोघांनी बाजार समितीतून रक्कम परत नेली आहे.
- समीर पेंडके, सचिव, कृउबा समिती वर्धा